महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडूनच हागणदारीमुक्त योजनेला हरताळ
By Admin | Updated: April 8, 2017 04:09 IST2017-04-08T04:09:39+5:302017-04-08T04:09:39+5:30
अलिबाग नगरपालिकेने शास्त्रीनगर विभागात स्वच्छ भारत अभियानांंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम चालू केले

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडूनच हागणदारीमुक्त योजनेला हरताळ
- जयंत धुळप
अलिबाग : अलिबाग नगरपालिकेने शास्त्रीनगर विभागात स्वच्छ भारत अभियानांंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम चालू केले होता. शास्त्रीनगर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर समुद्रकिनारी शौचास जातात त्यामुळे अलिबाग शहर हागणदारीमुक्त होण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे अलिबाग नगरपालिकेने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कंपाउंडलगत समुद्रकिनारी शौचालय बांधण्यास सुरुवात केली. परंतु महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे गेस्ट हाउस त्या परिसरात असल्यामुळे त्यास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्याने तीव्र विरोध करून हागणदारीमुक्तीलाच हरताळ फासला आहे.
सरकार हागणदारीमुक्ती बंधनकारक करत असतानाच त्याच सरकारच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड विभागाचे अधिकारी निव्वळ कधीकाळी त्यांचे गेस्ट हाउसमध्ये राहण्यास येतात म्हणून याला विरोध करत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मागील बाजूस एका नवीन हॉटेलचे बांधकाम सुरू असून त्या हॉटेलमधून ते शौचालय दिसू नये म्हणून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी व हॉटेल मालक यांनी संगनमताने विरोध केला असल्याची चर्चा येथील स्थानिक नागरिकांतून ऐकण्यास मिळाली.
दरम्यान, हे काम बंद करण्याचे तोंडी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अलिबाग नगरपरिषदेने या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. जिल्हाधिक ारी यावर काय निर्णय घेतात याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (विशेष प्रतिनिधी)
>सरकारचाच एक भाग असलेले महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सरकारच्याच उपक्रमाला विरोध करते यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
- प्रशांत नाईक, अलिबाग नगराध्यक्ष
नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेले हे सार्वजनिक शौचालय आमच्या कार्यालयाच्या समोरच बांधण्यात येत आहे, त्याचबरोबर त्याकरिता सीआरझेडची परवानगी घेण्यात आलेली नसल्याने आम्ही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत घेतली.
- कॅ. सूरज नाईक, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड प्रादेशिक बंदर अधिकारी