मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन महिने होऊन गेले तरीही अद्याप खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रतील जनतेने कधी नव्हे तेवढा सत्तासंघर्ष पाहिला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेण्याआधी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, या दोन महिन्यांत नेते सत्तासंघर्षात गुंतलेले असताना राज्यातील 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
महाराष्ट्राला गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, महापूराचा सामना करावा लागला आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने शेतमाल खराब झाला होता. तर महापुरामुळे पीकच आले नाही. 2015 मध्येही काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकड्यांनी 300 चा आकडा पार केला होता. नवभारत टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले 6552 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. तर राज्य सरकारने 30 सप्टेंबर आधीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. 2017 मध्ये भाजपाने 18 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते.