Maharashtra Kesri 2025 Fight: राज्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या अशा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले आहे. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेत पै. शिवराज राक्षे आणि पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य सामना पार पडला. यावेळी पृथ्वीराज मोहोळने काही सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. या पराभवाने संतापलेल्या शिवराज राक्षेने थेट पंचाची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला आहे.
महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. पृथ्वीराज मोहोळने 42 सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला अस्मान दाखवले. पण, शिवराजला त्याचा पराभव मान्य झाला नाही. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. सुरुवातीला त्याचे सहकारी पंचांना बोलायला गेले, यावेळी त्यांची पंचासोबत शाब्दिक बाचाबाची झाली.
यानंतर शिवराज तिथे आला, त्यानेही सुरुवातीला पंचांसोबत हुज्जत घातली आणि शेवटी राग अनावर झाल्याने त्याने आधी पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारली. माझी पाठ टेकली नव्हती, असे म्हणत शिवराज राक्षेने पराभव अमान्य केला. या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि शिवराजला दूर केले. या घटनेनंतर शिवराजने व्यासपीठावर खासदार पृथ्वीराज मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलण्याचा प्रयत्न केला. आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवराज राक्षेचे आव्हान
मला रेफरीचा निर्णय मान्य नाही. पंचांनी रिप्ले बघावा, जर पंचांनी त्यानंतर देखील निर्णय दिला तर आम्हाला मान्य आहे. त्याने डावा टाकला असेल आणि प्रतिस्पर्धी खेळाडूचे दोन्ही खांदे टिकलेले असेल तर कुस्ती फोल होते. माझे दोन्ही खांदे टेकलेले नाहीत. तुम्ही रिव्ह्यू पाहू शकता. चॅलेंज टाकल्यावर तुम्ही निर्णय देऊ शकत नाही. तुम्ही रिव्ह्यू बघा, कुस्ती जर चित झाली असेल तरच पंचांना निर्णय घेता येतो. पंचांना निर्णय घेण्याची घाई होती. मल्लाला 10 ते 15 मिनिट निर्णय घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे. आमची एकच मागणी आहे. रिव्ह्यू दाखवा, आम्ही हरलो तर आम्हाला पराभव मान्य आहे, असे शिवराज राक्षे म्हणाला.
काका पवार काय म्हणाले ?
या घटनेवर कुस्ती प्रशिक्षक काका पवार म्हणाले, दोन्ही मुले आमचीच आहेत. पंचानी जर निकाल चुकीचा दिला असेल, तर राग येऊ शकतो. त्याचे वर्ष वाया गेले. वर्षभर तयारी केलेली असते, त्या रागातून असे घडू शकते. त्याचे खांदे टेकले नसतील आणि पाठ टेकली नसेल, तर असे घडू शकते, असे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी म्हटले आहे.
असा प्रकार कधीच झाला नाही
आजच्या घटनेवर पै. चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र कुस्तीच्या स्पर्धेत असा प्रकार कधीच झाला नाही. असा प्रकार का झाला याचा विचार केला पाहिजे. निकाल देण्याची घाई करण्याची गरज नव्हती. राक्षेला आक्षेप नोंदवण्याची संधीच मिळाली नाही. गोष्टी क्लिअर करून निकाल दिला पाहिजे होता. व्हिडिओ पाहून दोन्ही खेळाडूंना गोष्टी समजावून मग निकाल दिला पाहिजे होता, असं चंद्रहार पाटील म्हणाले.