प्रधान, नार्वेकर, देसाई, पंडित, जैन यांना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार
By Admin | Updated: March 2, 2017 03:14 IST2017-03-02T03:14:59+5:302017-03-02T03:14:59+5:30
डॉ. लीना गुप्ता आदींसह चौदा कर्तृत्वान गुणवतींना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर घोषित झाले

प्रधान, नार्वेकर, देसाई, पंडित, जैन यांना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार
मुंबई: प्रख्यात अभिनेत्री तेजश्री प्रधान, दिग्गज नाटय निर्मात्या लता नार्वेकर, हास्य योगाच्या मास्टर ट्रेनर अदिती वाघमारे, विश्वविख्यात गिर्यारोहक कृष्णा पाटील वेठबिगारमुक्ती व आदिवासी कल्याणार्थ गेली अडीच दशके लढा देणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युल्लता पंडित, स्त्री हक्कासाठी झुंजणाऱ्या तृप्ती देसाई, मीरा भार्इंदरच्या महापौर गीता जैन, वैद्यकीय क्षेत्रात असीम कामगिरी बजाविणाऱ्या डॉ. लीना गुप्ता आदींसह चौदा कर्तृत्वान गुणवतींना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर घोषित झाले आहेत.
महाराष्ट्र प्रबोधन जीवन गौरव पुरस्कार पुण्याच्या मॅग्नमओपसचे चेअरमन व भारतातील लक्षावधी स्त्री भ्रूण हत्या रोखणारे गिरीष लाड यांना जाहीर झाला आहे.
नाशिक येथील आयकॉन फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप ५०००/- रूपये रोख, ट्रॉफी व मानपत्र असे असून सात मार्चला सायंकाळी सहा वाजता नरीमन पॉर्इंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रंगस्वर या सभागृहात होणाऱ्या शानदार सोहळयात ते त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान होणार आहे. हे पुरस्कारांचे ८ वे वर्ष आहे. या पुरस्काराच्या अन्य मानकऱ्यांमध्ये समाजसेविका छाया मोदी, पर्यावरण संवर्धक हंसा शाह, उद्योगपती मंजू याज्ञिक, प्रिया शहा, समाजसेविका सुमन जैन, प्रख्यात प्रकाशिका, कवयित्री सुमती लांडे यांचा समावेश आहे. ही माहिती आयकॉन फाऊंडेशनचे संचालक मनोज वरंदळ यांनी येथे दिली. महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव सौ. मनिषा म्हैसकर (क.अ.र.), एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निर्गुडकर, प्रख्यात अभिनेत्री सुहास जोशी, उद्योगपती किशोरभाई खाबिया यांची या सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. (प्रतिनिधी)