महाराष्ट्राकडे सहा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद
By Admin | Updated: July 8, 2016 00:20 IST2016-07-08T00:20:51+5:302016-07-08T00:20:51+5:30
पुणे, कोल्हापूर, नाशिक, लातूर जिल्ह्याला आयोजनाचा मान.

महाराष्ट्राकडे सहा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद
नीलिमा शिंगणे/ अकोला
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात येणार असलेल्या ६२ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २0१६-१७ चा वार्षिक कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आला. यंदा महाराष्ट्राकडे सहा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद सोपविण्यात आले. स्पर्धा आयोजनाचा मान पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि लातूर जिल्ह्याला मिळाला आहे.
पुणे येथे १७ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यात घेण्यात येतील. तसेच १९ वर्षाआतील अँथलेटिक्स स्पर्धा पुणे येथेच डिसेंबरच्या शेवटी होतील, तर कोल्हापूर जिल्ह्याला कबड्डी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी देण्यात आली. कोल्हापूरला १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील कबड्डी स्पर्धा होतील. ही स्पर्धादेखील नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याला होईल. नाशिक येथे १४ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील बॅडमिंटन स्पर्धा होईल, तर लातूरला नोव्हेंबरच्या तिसर्या आठवड्याला १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील सायकलिंग स्पर्धा घेण्यात येईल.
देशभरात ५१ ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, तेलंगणा राज्याला सर्वाधिक आठ स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला आहे.
विदर्भाला यंदा एकाही स्पर्धेची जबाबदारी नाही!
शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये सदैव अग्रेसर असलेल्या विदर्भ प्रदेशाला यंदा एकाही राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळालेले नाही, याबाबत क्रीडा तज्ज्ञांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.