महाराष्ट्र, हरियाणा विजयी
By Admin | Updated: December 30, 2014 23:32 IST2014-12-30T23:02:05+5:302014-12-30T23:32:05+5:30
अपंगांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा : मालवण बोर्डींग मैदानावर आयोजन

महाराष्ट्र, हरियाणा विजयी
मालवण : मालवण येथील लक्ष्मीबाई नारायण साटम स्पोर्टस् अॅण्ड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने धुरीवाडा येथील बोर्डींग मैदानावर आयोजित अपंग क्रिकेटपटूंच्या राष्ट्रीय ट्वेंटी-२0 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी पहिल्या दिवशी महाराष्ट्र संघाने उत्तरप्रदेशच्या संघाचा ३३ धावांनी दणदणीत पराभव केला. दुसऱ्या सामन्यात हरियाणा संघाने कर्नाटक संघाला ४७ धावांत गुंडाळत कर्नाटकचा दारूण पराभव केला. यावेळी अपंग क्रिकेटपटूंनी खेळात दाखविलेल्या जिद्दीचे मालवणवासीयांनी कौतुक केले.मालवण येथील बोर्डींग मैदानावरील सौ. लक्ष्मीबाई नारायण साटम पॅव्हेलियन- स्टेडीयमच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दादा महाराज घोसाळकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी दिगंबर सामंत, अशोक वाडेकर, शशिकांत विश्वासराव, दिलीपराव कल्याणकर, जयंत गवंडे, सुनील कुलकर्णी, अरूण शेवाळे, नारायण गावडे उपस्थित होते.मंगळवारी पहिल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना उत्तरप्रदेशचा संघ १२७ धावांत गारद झाल्याने महाराष्ट्र संघाने ३३ धावांनी विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटक संघाला हरियाणा संघाने अवघ्या ४७ धावात गारद केले. हा सामना १५-१५ षटकांचा खेळविण्यात आला. हरियाणा संघाने ५० धावा करीत सहज विजय मिळविला. बुधवारी महाराष्ट्र विरूद्ध कर्नाटक व उत्तरप्रदेश विरूद्ध हरियाणा असे सामने होणार आहेत.
अजित वाडेकर
उपस्थित राहणार
स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यांचे अपंग क्रिकेटपटूंचे संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा १ जानेवारीपर्यंत चालणार असून ३१ डिसेंबर रोजी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर हे उपस्थित राहणार आहेत.