महाराष्ट्र ‘गार’पटला
By Admin | Updated: April 12, 2015 02:40 IST2015-04-12T02:40:27+5:302015-04-12T02:40:27+5:30
राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या चोवीस तासांत १३ जणांचा बळी गेला

महाराष्ट्र ‘गार’पटला
चोवीस तासांत १३ बळी : आंबा, गहू, ज्वारीचे नुकसान; राज्यभरात अवकाळीचे थैमान
मुंबई : राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या चोवीस तासांत १३ जणांचा बळी गेला असून, शुक्रवारी पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता़ तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा, तर अन्य घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़ यामध्ये बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबारमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात गारपिटीसह अवकाळीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला शनिवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला़ बीड, परभणीत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे कांदा, आंबा, गहू, ज्वारी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ बीड जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. वीज पडून औरंगाबादजवळ शेख शमशाद शेख तय्यब (२२) या शेतमजूर महिलेचा, बीड
जिल्ह्यात श्रीराम सोपान पाचनकर (४२), दत्ता खाडे (१८) यांचा मृत्यू झाला़ बीडच्या पाटोदा तालुक्यात भिंत पडून शकुंतला रायचंद संचेती (७०) ही महिला मृत्युमुखी पडली़ परभणी आणि जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कर्नाटक ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा
गुजरातवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्याचबरोबर दक्षिण गुजरातपासून महाराष्ट्र, कर्नाटक ते लक्षद्वीपपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे बाष्पयुक्त वारे ओढले जात असून, त्यातून राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, वडूजमध्ये लिंबूच्या आकाराच्या गाराही पडल्या.
पश्चिम वऱ्हाडला अवकाळी पावसाने शनिवारी दुपारी पुन्हा एकदा झोडपले. वीज पडून लोणार तालुक्यात गजानन चोरमारे (३२) हा ठार झाला़ मलकापूर येथे वादळी वाऱ्याने टीनपत्रे उडून शे़ हुसेन शे़ ग्यासोद्दीन याचा दुर्दैवी मृत्यू झाला़
खान्देशात वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा येथे वीज पडून देवीदास भिका ठाकरे हा मजूर ठार झाला. भुसावळ, चाळीसगावसह बोदवड येथे पावसासह गारपीट झाली.