मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सांगली आणि कोल्हापूरमध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे स्थानिक नागरिक घरामध्ये अडकून पडले होते. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणाच लहान मुलं व जेष्ठ नागरिकांचा सामावेश होता. त्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ सोबतच जवान आणि स्थानिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरु केले होते.
त्याचप्रमाणे तेथील स्थानिक नागरिकांनी संकाटकाळी मदतीला धावून ज्यांनी मदत केली अश्या लोकांनाच देव मानले आहे. त्यातच एक चिमुकलीने जवानाचे आभार मानतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप चांगले काम करतात असे बोलत तीने जवानाला सलाम केला आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ आणि गुजरातमध्ये पुराने थैमान झाले आहे. तसेच गेल्या काही दिवसात या चार राज्यात अतिवृष्टीमुळे एकुण 174 जणांना प्राण गमवावा लागला. यामध्ये केरळमध्ये 76 जणांचा मृत्यू झाला आहे तर, महाराष्ट्रात 35 आणि गुजरात व कर्नाटक राज्यात 31- 31 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत लाखो कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहेत.
कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यात पंचगंगा, कोयना नदीला आलेल्या पुरात शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता या गावांच्या, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी राज्यभरातून लाखो हात पुढे येत आहेत. जमेल ती आणि जमेल तशी मदत राज्यभरातून येत आहे.