नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे हे विजयी झाले होते. त्यानंतर आज झालेल्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी राणे कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत डिवचले आहे.
उद्धव ठाकरे यांना उद्देशून सोशल मीडियावर लिहिलेल्या पत्रात निलेश राणे म्हणाले की, ‘’तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.