Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेते सातत्याने ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडताना दिसत आहेत. तसेच महाविकास आघाडीतील पक्षांतर्गत धुसपूस समोर येत आहे. काँग्रेसमधील आणखी एका नेत्याने पक्षावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
पराभव झाल्यानंतर बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे RSS चे एजंट आहेत. राहुल गांधी यांनी उमेदवारी दिल्याने मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो. हस्तक्षेप करून मला उमेदवारी देण्यात आली. हे नाना पटोले यांना पटले नाही. प्रचारात संघटनेची मदत झाली नाही. पटोलेंनी या मतदारसंघात प्रचारासाठी नेत्यांना पाठवले नाही. ते स्वतः ही प्रचारासाठी आले नाही. कुठलीही मदत केली नाही, अशी टीका बंटी शेळके यांनी केली. अशीच टीका आता कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.
पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले
काँग्रेसने आम्हाला फक्त तिकीट दिले आणि नंतर प्रत्येकाला वाऱ्यावर सोडून दिले. प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे होते त्या पद्धतीने लढले नाही, आम्हाला पक्षाकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही. जालना मतदारसंघात काँग्रेसच्याच काही लोकांनी गद्दारी केली. काँग्रेसने एकही सभा घेतली नाही. जी काही सामग्री द्यायला पाहिजे होती ती दिली नाही, या शब्दांत आरोप करत कैलास गोरंट्याल यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. जालना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना पराभवाचा धक्का बसला. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांचा विजय झाला.
दरम्यान, काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक मात्र विभागली गेली. त्यामुळे आपला पराभव झाला. शिवसेना आणि भाजपाच्या प्रत्येक उमेदवाराला ४० ते ५० कोटी रुपये पार्टीने दिले. अदानींनी धारावी झोपडपट्टीचे काम मिळायला पाहिजे म्हणून त्यांना हे पैसे दिल्याचा आपण ऐकले आहे. जालना मतदारसंघात विरोधकांनी सरासरी दीड लाख लोकांना पैसे वाटले. त्यामुळे हा भाजपाचा, शिवसेनेचा विजय नाही तर हा पैशाचा विजय आहे, असा गंभीर आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला.