नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात एकेकाळी राज्यात निर्विवाद सत्ता असलेल्या काँग्रेसचीही जबर पिछेहाट होऊन पक्षाला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे लागले होते. या पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून इव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाची कुणकूण काँग्रेसला मतदानाआधीच लागली होती की काय, अशी चर्चा आता रंगली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेसने केलेल्या एका अंतर्गत सर्व्हेमधील निष्कर्षांबाबतचं वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्याने ही चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वीच एक अंतर्गत सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये काँग्रेसचा समावेश असलेली महाविकास आघाडी ही लोकसभा निवडणुकीत मिळालेली आघाडी कायम ठेवण्यात यशस्वी ठरणार नाही, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना लोकांमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली असून, त्यामधून महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणात महायुतीकडे वळणार असल्याचंही या सर्व्हेत म्हटलं होतं.
विधानसभा निवडणुकीचं मतदान होण्याआधी चार आठवड्यांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात हा सर्व्हे करण्यात आला होता. महाविकास आघाडीचा प्रभाव असलेल्या १०३ जागांवर हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीतील मिळालेली आघाडी कायम राखण्यात यशस्वी ठरत नसल्याचे नमूद करण्यात आले होते. सर्व्हेमधील आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला विजयाची अपेक्षा असलेल्या १०३ जागांपैकी केवळ ४४ जागांवरच महाविकास आघाडीचा विजय होताना दिसत होतं. तर भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीची आघाडी ४९ जागांवरून ५६ जागांपर्यंत जात असल्याचा उल्लेखही या सर्व्हेत होता.
याशिवाय या सर्व्हेमधून विविध जाती आणि धार्मिक समुदायातील मतदारस कशा प्रकारे मतदान करतील, याचाही अंदाज घेण्यात आला होता. त्यामध्ये मुस्लिम वगळता इतर समुदायांमध्ये महायुतीला असलेली आघाडी वाढत असल्याचं दिसून आलं होतं.