महाराष्ट्राचा २०२५-२६ वर्षाचा अर्थसंकल्प आज वित्तमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहात सादर केला. दरम्यान, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सभागृहातील कामकाज संपल्यावर विधानभवनाच्या परिसरात घडलेल्या घटनेची आता एकच चर्चा सुरू आहे. त्याचं झालं असं की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहाबाहेर येत होते. त्याचवेळी तिथे उभे असलेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची नजरानजर झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. मात्र पाठून येत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी हळूच बाजू घेत उद्धव ठाकरेंच्या समोर येणं टाळलं.
विधान भवनामध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून, त्यामध्ये अर्थसंकल्प आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जाताना दिसत आहेत. तर वाटेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर हे दिसत आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याजवळ आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवेंशी हस्तांदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडासा हास्यविनोदही झाला. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मागून येत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी समोर उद्धव ठाकरे असल्याचे दिसताच त्यांना न पाहिल्यासारखं करून तिथून हळूच बाजू मारली. तसेच उद्धव ठाकरेंकडे दुर्लक्ष करून तिथून निघून गेले. आता या घटनेची एकच चर्चा विधान भवानाच्या आवारात आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे.