महाडमध्ये उसळला भीमसागर

By Admin | Updated: March 20, 2015 22:45 IST2015-03-20T22:45:18+5:302015-03-20T22:45:18+5:30

चवदार तळे सत्याग्रहाच्या ८८ व्या वर्धापनदिनी महाडमध्ये महामानवाला अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महाराष्ट्रातून महाडमध्ये भीमसागर लोटला होता.

In Mahad, Usalala Bhimasagar | महाडमध्ये उसळला भीमसागर

महाडमध्ये उसळला भीमसागर

महाड : चवदार तळे सत्याग्रहाच्या ८८ व्या वर्धापनदिनी महाडमध्ये महामानवाला अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महाराष्ट्रातून महाडमध्ये भीमसागर लोटला होता. मानवी मूलभूत हक्कासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे पाणी पिऊन पाण्यासाठी सत्याग्रह करीत सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्या ऐतिहासिक दिनाच्या स्मृती समाजात सतत जागृत रहाव्यात यासाठी दरवर्षी महाडमध्ये २० मार्च हा मुक्ती दिन म्हणून साजरा होतो.
गुरुवारी चवदार तळे व क्रांतिस्तंभाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी पुष्पहार वाहून अभिवादन केले. माजी आ. माणिक जगताप, महाडच्या नगराध्यक्षा भारती सकपाळ, पं. स. सभापती दीप्ती कळसकर, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, पोलीस उपअधीक्षक शिवाजीराव देशमुख, तहसीलदार संदीप कदम, दलितमित्र मधुकर गायकवाड,बाबाजी साळवे, केशव हाटे या रिपाइं नेत्यांनीही पुष्पहार वाहिला.
डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील पुस्तके, सिडीज, किचेन, लॉकेट्स आदी विक्रीची रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटण्यात आली होती. या वस्तू खरेदी करण्यासाठीही भीमसैनिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.
बौद्धजन पंचायत समिती सभापती आनंदराज आंबेडकर, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, मनोज संसारे, माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले. महाड नगरपरिषदेतर्फे सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली होती. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. शहरात रिपाइंचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज लावले होते. राष्ट्रीय स्मृती स्मारकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यालाही अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. या स्मारकाला करण्यात आलेली विद्युत रोषणाई खास आकर्षण ठरले होते. (वार्ताहर)

 

Web Title: In Mahad, Usalala Bhimasagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.