महाड पूल सहा महिन्यांत
By Admin | Updated: August 7, 2016 02:23 IST2016-08-07T02:23:48+5:302016-08-07T02:23:48+5:30
महाड येथील घटना अतिशय दु:खद असून आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. १८० दिवसांत पुलाचे काम पूर्ण करू, याकरिता ३० कोटींचे टेंडर मजूर करण्यात आले आहे.
महाड पूल सहा महिन्यांत
पनवेल : महाड येथील घटना अतिशय दु:खद असून आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. १८० दिवसांत पुलाचे काम पूर्ण करू, याकरिता ३० कोटींचे टेंडर मजूर करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. या डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.
खारघर येथे रामशेठ ठाकूर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी, पनवेलच्या नगराध्यक्ष चारुशीला घरत, युवा नेते परेश ठाकूर, आय . टी . देशमुख, अरुण भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या काळात संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देशाला पुढे जायचे असेल तर तरुणांनी उच्चशिक्षण घ्यायला हवे. कोकणचा सागरी किनारा येथील विकासाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. कोकणात २० हजार एकर जागेवर पोर्ट तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात पेट्रोलियम मंत्र्यांशी देखील चर्चा झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. देशात जलवाहतूक तसेच पोर्ट संदर्भात अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. मालदीवसारख्या देशात पाण्यावर उतरणाऱ्या सीप्लेनची (विमान) संख्या ४७ आहे. मात्र भारतात एकही नाही. अशी विमान वाहतूक सेवा भारतात सुरू झाली तर देशांतर्गत कोठेही सहज प्रवास शक्य होणार आहे. देशात ३० लाख वाहनचालकांची कमतरता आहे. यापुढे संगणकाद्वारे वाहन चालकांची परीक्षा घेतली जाईल. तीस दिवसांत वाहनचालकाला परवाना दिला जाईल. परिवहन अधिकाऱ्याने तो परवाना दिला नाही तर त्याच्यावर कारवाईची तरतूद करण्यात येणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
मुंबई पुणे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबविल्या जाणार आहेत, असेही गडकरी यांनी नमूद केले. खारघर, पनवेल, नवी मुंबई परिसरात जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचे काम संस्था करीत असून चांगली पिढी घडविण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ९५ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. याकरिता कर्नाळा अभयारण्याचा अडथळाही दूर करण्यात आलेला आहे. डिसेंबर महिन्यात काम सुरू होईल व दोन वर्षांत ते पूर्ण केले जाणार आहे. दहा टप्प्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. ४७० किमीचा हा महामार्ग आहे.