महाड पूल दुर्घटना - लोकमतने ३ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा
By Admin | Updated: August 3, 2016 17:36 IST2016-08-03T12:16:51+5:302016-08-03T17:36:36+5:30
महाड-पोलादपूरला जोडणा-या या पुलाच्या दुरावस्थेकडे लोकमतने तीनवर्षापूर्वीच लक्ष वेधले होते. नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत होता.

महाड पूल दुर्घटना - लोकमतने ३ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - सावित्री नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेला सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे. महाड-पोलादपूरला जोडणा-या या पुलाच्या दुरावस्थेकडे लोकमतने तीनवर्षापूर्वीच लक्ष वेधले होते. नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून, हा पूल धोकादायक बनला आहे असे वृत्त लोकमतने ३ सप्टेंबर २०१३ च्या हॅलो रायगड पुरवणीत दिले होते.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील या पुलाची मुदत संपल्याचे ब्रिटीश एजन्सीने संबंधित यंत्रणेला सूचित केल्याच्या वृत्ताला त्यावेळी संबंधिक अधिका-यांनी दुजोरा दिला होता. पुलाच्या दगडी बांधकामामध्ये पिंपळाच्या झाडाचे साम्राज्य पसरले होते.
झाडाची मुळे दगडामध्ये खोलवर रुजल्याने दगडी बांधकामामध्ये भेगा पडून ते ढासळू लागले होते. पुलाच्या काही भागात क्रॅश बॅरिअर्स बसवण्यात आले असले तरी, उर्वरित संरक्षण कठडयांचे काही दगड ढासळले होते. औद्योगिक दृष्टया रायगड आणि रत्नागिरी जिल्हा विकसित झाल्याने या पूलावरुन अवजड वाहनांची वाहतुक सुरु असायची.
पूलाची क्षमता आणि ब्रिटीश एजन्सीने दिलेला इशारा लक्षात घेता हा पूल धोकादायकच होता. वेळीच दखल घ्या अन्यथा भविष्यात मोठा अनर्थ ओढवेल असा इशारा त्यावेळीच लोकमतच्या वृत्तातून देण्यात आला होता. पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अखेर आज तो अनर्थ ओढवलाच.