‘मेग्मो’चे डॉक्टर आजपासून संपावर
By Admin | Updated: June 2, 2014 12:44 IST2014-06-02T06:41:56+5:302014-06-02T12:44:06+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागातील १२ हजार वैद्यकीय अधिकारी त्यांच्या विविध ११

‘मेग्मो’चे डॉक्टर आजपासून संपावर
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील १२ हजार वैद्यकीय अधिकारी त्यांच्या विविध ११ मागण्यांबाबत राज्य सरकारने ३१ मे पर्यंत धोरणात्मक निर्णय घेतला नसल्यामुळे सोमवारपासून बेमुदत संप पुकारणार आहेत. राज्यातील १२ हजार वैद्यकीय अधिकारी सामुहिक रजा टाकून आझाद मैदान येथे एकत्र जमणार आहेत. वैद्यकिय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांची शिखर संघटना असलेल्या ‘मॅग्मो’ला (महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना) दीड लाख कर्मचार्यांनी आणि मार्ड संघटनेने ही पाठिंबा दिला आहे. मात्र मार्ड संपातमध्ये सहभागी होणार नसल्याचे मार्डने स्पष्ट केले आहे. सन २००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्यांना पूर्वलक्ष लाभ देण्यात यावा, अस्थायी स्वरूपात काम करणार्या सुमारे ७८९ बीएएमएस व ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट ब यांना कायम सेवेत घेण्यात यावे, १ जानेवारी २००६ पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाचगणी येथे मॅग्मो संगटनेच्या मॅगकॉन परिषदेत केलेल्या घोषणेनुसार आरोग्य विभागाचा पुर्नरचना आयोग स्थापन करण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात यावी, अशा एकूण ११ मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून संप पुकारत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले. या संपामुळे बाह्य रूग्ण विभाग (ओपीडी), शस्त्रक्रिया आणि शवविच्छेदन केंद्रही बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयात येणार्या राज्यातील ८० टक्के रूग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)