मॅगी करत होती फसवणूक
By Admin | Updated: June 7, 2015 01:47 IST2015-06-07T01:47:37+5:302015-06-07T01:47:37+5:30
देशभरात मॅगीवर बंदी घातल्यावर अखेर १६ दिवसांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने मॅगीच्या नमुन्यांचा संपूर्ण अहवाल सादर केला.

मॅगी करत होती फसवणूक
मुंबई : देशभरात मॅगीवर बंदी घातल्यावर अखेर १६ दिवसांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने मॅगीच्या नमुन्यांचा संपूर्ण अहवाल सादर केला. राज्यातून घेतलेल्या २० नमुन्यांपैकी ५ नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त शिसे आढळले आहे. पाकिटावर ‘अजिनोमोटो नाही’ असे छापले असतानाही सर्व नमुन्यांत अजिनोमोटो आढळून आले.
त्याचप्रमाणे अन्नसुरक्षा प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही मॅगी ओट्स मसाला न्यूडल्स विकत होते. अशा प्रकारे मॅगी ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे एफडीए अहवालात स्पष्ट झाले आहे. याच मुद्द्यांवर इतर राज्यातही मॅगीवर बंदी घातली आहे.
बाराबंकी येथील मॅगीच्या पाकिटात शिश्याचे जास्त प्रमाण आढळल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा ठिकाणांहून २० नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी १५ नमुन्यांमध्ये शिश्याचे प्रमाण योग्य असल्याचे आढळून आले.
तर, पाच नमुन्यांमध्ये (२.५५, २.५९, २.६०, २.६२, ४.६६ पीपीएम) शिश्याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. हिमाचल प्रदेश, गोवा व उत्तराखंडमध्ये तयार झालेल्या मॅगीत शिश्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. मॅगीच्या प्रत्येक पाकिटावर मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) नाही, असा टॅग लावण्यात येतो. पण, प्रत्यक्षात मॅगीच्या प्रत्येक नमुन्यांमध्ये एमएसजी आढळून आले आहे.
मॅगीला अन्नसुरक्षा प्राधिकरणाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु, मॅगी ओट्स मसाला न्यूडल्सला ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. तरीही बाजारात खुलेआमपणे विक्री होते. न्यूडल्सच्या ९ वेगवेगळ्या प्रकारांचा साठा परत पाठवण्याचे आदेश दिले.
आयुक्तांनी घातली बंदी... : अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी ‘राज्यात मॅगीला बंदी’ अशी घोषणा ५ जूनला केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी ६ जूनला नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर एफडीए आयुक्तांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६चे कलम ३०(२)नुसार प्राप्त अधिकारानुसार राज्यात मॅगीच्या बंदीचे आदेश दिले आहेत.