‘मॅगी’वर बंदी!
By Admin | Updated: June 6, 2015 02:27 IST2015-06-06T02:27:39+5:302015-06-06T02:27:39+5:30
राज्यात ‘मॅगी नूडल्स’च्या विक्रीवर शनिवारपासून बंदी घालण्यात येत असून त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी जाहीर केले.

‘मॅगी’वर बंदी!
सिंगापूरमध्येही प्रतिबंध : राज्यात विक्री आढळल्यास कठोर कारवाई
पुणे : मॅगी नूडल्सच्या नमुन्यात परवानगीपेक्षा जास्त शिशाचे (लेड) प्रमाण वेगवेगळे आढळल्यामुळे राज्यात ‘मॅगी नूडल्स’च्या विक्रीवर शनिवारपासून बंदी घालण्यात येत असून त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी जाहीर केले.
राज्याच्या विविध भागांतून घेतलेले नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आले होते. रात्री उशिरा त्याबाबतचा अहवाल शासनाला प्राप्त झाला. बापट यांनी याबाबत तातडीने अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात मॅगी विक्रीवर बंदी घालत असल्याचा निर्णय जाहीर केला.
मॅगीच्या काही नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये २.५ ऐवजी शिशाचे प्रमाण वेगवेगळे आढळले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शनिवारपासून ही बंदी अंमलात येणार आहे. सर्व विक्रेत्यांनी आपल्याकडील स्टॉक कंपनीकडे परत पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांकडून तपासणी होणार असून एखाद्या विक्रेत्याकडे मॅगीचा स्टॉक आढळल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. पुढील आदेश येईपर्यंत मॅगीची विक्री करू देऊ नये, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागास दिल्या असल्याचे बापट म्हणाले.
खरेदीदाराला पाकिटावरून त्यातील शिसाच्या प्रमाणाविषयी काही कळत नाही. शिसाचे जादा प्रमाण असलेली मॅगी आरोग्यास घातक असते. पुण्यात घेतलेल्या सहा नमुन्यांपैकी तीन अप्रमाणित आढळले असून उत्तराखंडमधील कंपनीत बनलेल्या एका नमुन्यात २.५५ तर दुसऱ्या नमुन्यात ४.६६ टक्के शिसे आढळले असून गोव्यातील कंपनीच्या नमुन्यात २.५९ तर अन्य एका नमुन्यात ०.२४ टक्के शिसे आढळले आहे. मोनोसोडियम ग्लुटामेटचे (एमएसजी) असल्याचे पाकिटांवर नमूद आहे, पण प्रत्यक्षात तपासणीत ते आढळले नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
अन्न औषध प्रशासनाकडून शनिवारपासून दुकानांमध्ये तपासणी सुरू करण्यात येणार आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असे सांगून बापट म्हणाले, कोणत्या विक्रेत्याने कंपनीला किती माल परत पाठविला याचा अहवाल घेतला जाणार आहे.
एफएसएसएआयची नोटीस
सुरक्षाविषयक हमी सादर न करता नेस्लेने ‘मॅगी ओट्स मसाला नूडल्स विद टेस्टमेकर’ विनापरवानगी भारतीय बाजारात आणले. यामुळे हे उत्पादनही तात्काळ प्रभावाने मागे घेण्याचे आदेश एफएसएसएआयने नेस्लेला दिले. नेस्लेने स्वाद वाढविणाऱ्या मोनोसोडियम ग्लुटामेट या त्तत्वासंदर्भात लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपकाही एफएसएसएआयने ठेवला. यासंदर्भात एफएसएसएआय नेस्लेला नोटीस जारी केली असून १५ दिवसांत त्याचे उत्तर देण्याचे बजावले. याशिवाय तीन दिवसांत कायदा पालन अहवाल तसेच उत्पादन मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दैनंदिन प्रगती अहवाल देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मॅगी सुरक्षितच
आम्ही मॅगी नूडल्समध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट(एमएसजी) मिसळत नाही. एमएसजी आढळले असेल तर याचे कारण मसाल्यात टाकण्यात येत असलेले नैसर्गिक पदार्थ (इन्ग्रीडियंट) असू शकतात. आम्ही यानंतर आमच्या उत्पादनावरून ‘नो एमएसजी’ हटवून ‘नो अॅडेड एमएसजी’ असे लिहू. आक्षेपांना आमचा इन्कार नाही. पण, याउपरही आमची कंपनी आणि आमच्या प्रयोगशाळा कुठल्याही तपासणीसाठी खुल्या आहेत. - पॉल बुल्के, (सीईओ) नेस्ले
अन्नसुरक्षेबाबत कुठलीही तडजोड नाही - नड्डा
नेस्ले कंपनीने मॅगी नूडल्ससंदर्भात अन्नसुरक्षा आणि गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले, हे विविध राज्यांकडून प्राप्त अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे उत्पादन बाजारपेठेतून मागे घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अन्नसुरक्षेबाबत सरकार कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
नेस्लेने गेल्या वर्षी जुलैमध्ये मॅगी ओट्स मसाला नूडल्ससाठी मंजुरी मागितली होती. एफएसएसएआयने काही स्पष्टीकरण मागितले होते. मात्र ते न देताच, नेस्लेने ओट्स मसाला नूडल्स बाजारात आणले. हे नियमांचे गंभीर उल्लंघन आहे, असे एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी वाय.एस. मलिक म्हणाले.
देशभरातील बाजारातून अखेर घेतली माघार
नवी दिल्ली : अनेक राज्यांतील बंदी व फूड सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड अॅथॉरिटी आॅफ इंडिया (एफएसएसएआय)ने देशवासीयांच्या आरोग्यासाठी मापदंडाच्या कसोटीचा फास आवळल्यानंतर नेल्से कंपनीने मॅगी नूडल्सच्या बाबतीत बाजारातून काढता पाय घेतला आहे.
भारतीय ग्राहकांचा विश्वास डळमळीत झाल्याची जाणीव झाल्यानंतर नेस्लेने माघार घेत, मॅगी नूडल्सचा सगळा साठा व उत्पादन भारतीय बाजारपेठेतून हटविण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. प्रत्यक्षात ही माघारही केंद्र सरकारने कठोर आदेश दिल्यानंतर घेण्यात आली.
कोट्यवधी भारतीयांच्या आरोग्याकडे धंद्यासाठी डोळेझाक करण्याच्या वृत्तीवर जगभरात प्रतिकूल पडसाद उमटू लागले आहेत. भारतातून आयात मॅगी नूडल्सच्या विक्रीवर सिंगापूरमध्ये तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मॅगीत ‘लेड’चे प्रमाण अधिक असल्याची वृत्ते आल्यानंतर सिंगापूर प्रशासनाने मॅगीची विक्री तात्पुरती रोखण्याचा निर्णय घेतला.