युतीतील तणावामुळे मनसेचे वेट अॅण्ड वॉच!
By Admin | Updated: September 16, 2014 02:44 IST2014-09-16T02:44:18+5:302014-09-16T02:44:18+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी औरंगाबादेत इच्छुकांच्या मुलाखती घेत असतानाच अचानक काढता पाय घेतला.

युतीतील तणावामुळे मनसेचे वेट अॅण्ड वॉच!
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी औरंगाबादेत इच्छुकांच्या मुलाखती घेत असतानाच अचानक काढता पाय घेतला. तसेच सायंकाळी प्रसिद्धिमाध्यमांनाही सामोरे जाण्याचे टाळले. दोन्हींमागे त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले. मात्र, यामागील खरे कारण हे शिवसेना-भाजपा युतीतील वाढता तणाव असल्याचे बोलले जात आहे. युतीत बेबनाव झाला तर मनसेने भाजपाचा नवीन मित्रपक्ष बनण्याची तयारी चालवल्याचे सूत्रंनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी मराठवाडा आणि खान्देशातील इच्छुकांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या. सकाळी 11 वाजता मुलाखतींना सुरुवात झाली. काही मुलाखती झाल्यानंतर प्रकृतीचे कारण सांगून राज तेथून बाहेर पडले. त्यानंतर उर्वरित मुलाखती घेण्याची जबाबदारी गटनेते बाळा नांदगावकर, आ. प्रवीण दरेकर, आ. मंगेश सांगळे आदींवर सोपवून त्यांनी हॉटेल गाठले. दरम्यान, राज हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याने त्यांना मुलाखतींच्या काळातही सतत दिल्ली-मुंबईहून भाजपा नेत्यांचे फोन येत होते. याच कारणामुळे त्यांनी सायंकाळी प्रसिद्धिमाध्यमांनाही टाळले. नियोजित कार्यक्रमानुसार राज ठाकरे सायंकाळी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधणार होते. त्यानुसार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हॉटेलमध्ये गर्दी केली होती. मात्र, राज दोन तास उशिराने प्रसिद्धिमाध्यमांना सामोरे गेले; पण त्यांनी प्रकृती बरी नसल्याचे सांगत आज बोलणार नसल्याचे सांगितले. त्याचे कारणही युतीतील तणाव असल्याचे बोलले जाते. जर शिवसेना-भाजपा युती झाली नाही, तर भाजपाचा सहकारी म्हणून मनसेची महाराष्ट्रात भाजपा-रिपाइं-स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याशी युती होण्याची शक्यता आहे. युतीत बेबनाव झाल्यास राज ठाकरे भाजपाचे नवीन सहकारी राहतील व त्यामुळे त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेण्याचे टाळले. युतीचे काय होते ते बघून राज ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपासोबत जायचे झाल्यास मनसेसाठी 5क् जागाही पुरेशा ठरतील, असे मनसेच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. (प्रतिनिधी)