आरेतील मेट्रो-३ कार्यालयाची मनसेकडून तोडफोड
By Admin | Updated: March 11, 2015 02:32 IST2015-03-11T02:32:05+5:302015-03-11T02:32:05+5:30
गोरेगाव येथील आरे वसाहतीमधील प्रस्तावित मेट्रो-३ प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी

आरेतील मेट्रो-३ कार्यालयाची मनसेकडून तोडफोड
मुंबई : गोरेगाव येथील आरे वसाहतीमधील प्रस्तावित मेट्रो-३ प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी
५ वाजण्याच्या सुमारास मेट्रो-३ कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातारण निर्माण झाले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात आरे सब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेट्रो प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध तीव्र होताच राजकीय पक्षांनीही यामध्ये उडी घेतली आहे. शिवसेना, भाजपा, मनसे यांनीही आरेतील वृक्षतोडीला विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मनसेने काही दिवसांपूर्वी आरे वसाहतीमध्ये आंदोलनही केले होते. सोमवारी मनसेच्या ९व्या वर्धापन दिनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. ठाकरे यांच्या विरोधाला काही तास उलटत नाहीत, तोच मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून (क्रमांक-१३००) आलेल्या नऊ ते दहा तरुणांनी आरे वसाहतीमधील पिकनिक पॉइंटजवळील प्रस्तावित मेट्रो-३ प्रकल्पाच्या एस.के. कन्स्ट्रक्शनच्या कंटेनर कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. यामध्ये कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत.
फोडफोड केल्यानंतर तरुणांनी कार्यालयाचा सुरक्षारक्षक रवींद्र डुगज यांना मारहाण केली.
या प्रकारानंतर तरुणांनी मेट्रो कार्यालयावर मनसेचे दोन झेंडे लाऊन इनोव्हा कारमधून गोरेगावच्या दिशेने पलायन केले. त्यांनी मद्यप्राशन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी आरे सब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)