म. रे.ची गाडी वक्तशीरपणात घसरली
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30
मध्य रेल्वेमार्गावरील लोकल गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विलंबाने धावत आहेत.

म. रे.ची गाडी वक्तशीरपणात घसरली
मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील लोकल गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विलंबाने धावत आहेत. गेल्या दोन महिन्यांत जवळपास १0 हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना विलंब झाल्यामुळे वक्तशीरपणाची गाडी गडगडल्याचेच चित्र आहे. मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वे बोर्ड सदस्यांकडूनही वक्तशीरपणाची माहिती घेण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत वक्तशीरपणा वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सिग्नल यंत्रणेत किंवा लोकलमध्ये बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, रुळाला तडा जाणे आणि पेन्टाग्राफमध्ये तांत्रिक समस्या उद्भवणे इत्यादींमुळे मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणावर दुष्परिणाम होत आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील दिवा व ठाकुर्ली फाटक आणि हार्बरवरील चुनाभट्टी फाटकामुळे समस्येत भर पडत आहे. यंदाच्या मे महिन्यात मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर मिळून वक्तशीरपणाचे प्रमाण जवळपास ८८ टक्के होते. मागील वर्षी हेच प्रमाण ९0 टक्के होते. हे पाहता जवळपास दोन टक्क्यांनी वक्तशीरपणा कमी झाला असून मे महिन्यात ४ हजार ९६0 लोकल फेऱ्यांना विलंब झाला. मेन लाइन आणि हार्बरवर असलेल्या फाटकांमुळे रोज ५0 लोकल फेऱ्यांना विलंब होत आहे. (प्रतिनिधी)
>मेन लाइन
आणि हार्बरवर रोज तीन ते चार सिग्नलमधील बिघाडाच्या घटना घडत आहेत.
या दोन्ही मार्गांवर मिळून रोज १ हजार ६५0 लोकल फेऱ्या होतात. महिन्याला ५0 हजारांच्या आसपास फेऱ्या होत असून यात ५ हजारांपर्यंत फेऱ्यांच्या वक्तशीरपणाची ऐशीतैशी होते.