कमी दाबाचे क्षेत्र विरले; मुंबईवरील मळभ हटले
By Admin | Updated: November 19, 2014 05:09 IST2014-11-19T05:09:46+5:302014-11-19T05:09:46+5:30
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता विरले असून, मुंबईवरील मळभदेखील हटले आहे.

कमी दाबाचे क्षेत्र विरले; मुंबईवरील मळभ हटले
मुंबई : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता विरले असून, मुंबईवरील मळभदेखील हटले आहे. गेल्या आठवडाभरापासून समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम होता. परिणामी मुंबईत ढगाळ वातावरण होते. शिवाय पावसाच्या धाराही पडल्या होत्या.
गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यासह मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात आले. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. शिवाय पडलेल्या पावसाचे पाणी साचून डेंग्यूचा धोका वाढला. दरम्यान, नोव्हेंबरच्या मध्यात मुंबईकरांना थंडी जाणवते. मात्र पूर्वेकडच्या वाऱ्यामुळे अद्यापही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव जाणवू लागलेला नाही. त्यात कमाल आणि किमान तापमानही अनुक्रमे ३५, २५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असल्याने मुंबईकरांना हा हवाबदल रुचेनासा झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. कोकण-गोव्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)