प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराचा मृत्यू
By Admin | Updated: October 31, 2014 00:52 IST2014-10-31T00:52:29+5:302014-10-31T00:52:29+5:30
प्रेयसीच्या आत्महत्येच्या काही वेळेनंतरच प्रियकराचाही संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे यशोदरानगरात (आनंदनगर) उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमुळे आज सकाळी परिसरात तणावही होता.

प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराचा मृत्यू
उलटसुलट चर्चा : यशोधरानगरात तणाव
नागपूर : प्रेयसीच्या आत्महत्येच्या काही वेळेनंतरच प्रियकराचाही संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे यशोदरानगरात (आनंदनगर) उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमुळे आज सकाळी परिसरात तणावही होता.
खुशबू नारायण हारोडे (वय २५) आणि मयूर त्र्यंबक मेश्राम (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. आनंदनगरातील निकुंज शाळेजवळ पाली यांच्या घरी खुशबू भाड्याने राहात होती. तिच्या घराच्या मागच्या बाजूला मयूरचे घर आहे. या दोघांचे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बुधवारी सायंकाळी ४ वाजता खुशबूने विष प्राशन केले.
तिला मेयोत नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयूरला ही वार्ता कळली. त्यामुळे तो तिच्या घरी गेला. रात्री ७ च्या सुमारास मयूर जखमी अवस्थेत घराजवळ आढळला. त्याच्या पोटावर धारदार शस्त्राचे घाव होते. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचाराकरिता मेयोत नेले. उपचार सुरू असताना पहाटे २ च्या सुमारास मयूरचा मृत्यू झाला.
प्रेमी युगुलाचा असा करुण अंत झाल्यामुळे आज सकाळपासूनच आनंदनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच यशोदरानगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोघांच्याही कुटुंबीयांचे बयान नोंदवले. त्यानंतर प्रेयसीच्या विरहात मयूरने स्वत:ला जखमी करून आत्महत्या केल्याचा अंदाज बांधून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)
दोघांची चौकशी
मयूरची घराजवळच मोबाईल शॉपी होती. मयूरचा खून करण्यात आल्याची चर्चा सकाळपासून परिसरात ऐकू येत होती. त्यामुळे पोलिसांनी दोन संशयितांना ठाण्यात आणून त्यांची दिवसभर चौकशीही केली. मात्र, त्यांनी मयूरला मारल्याचा इन्कार केला. खुनाचे कोणतेही पुरावे पोलिसांना मिळाले नाही. त्याला दुसरे कुणी जखमी केले नाही, तर त्यानेच स्वत:ला भोसकल्याचे काहींनी सांगितल्यामुळे पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.