लॉटरीची लालसा पडली महागात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:25 IST2016-06-30T00:25:04+5:302016-06-30T00:25:04+5:30
रेल्वे कर्मचा-याची २0 लाखाने फसवणूक

लॉटरीची लालसा पडली महागात!
मलकापूर (जि. बुलडाणा) : अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याबाबत आलेल्या ह्यएसएमएसह्णला प्रतिसाद देणे एका रेल्वे कर्मचार्याला चांगलेच महागात पडले आहे. शासकीय सेवेत असलेल्या शिवाजी रामभाऊ राऊत यांची लॉटरी प्रकरणात २0 लाख रुपयाने फसवणूक झाली असून, यासंदर्भात त्यांनी केलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी बुधवारी १७ खातेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर येथील शिवाजी रामभाऊ राऊत हे बोदवड येथे रेल्वे विभागात कार्यरत आहेत. १२ डिसेंबर २0१५ रोजी त्यांना अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचा एसएमएस त्यांच्या भ्रमणध्वनीवर मिळाला. भ्रमणध्वनीवरील संदेशानुसार राऊत यांनी शेगाव येथील 'एसबीआय'शाखेमधून सूचविण्यात आलेल्या संबंधित बँक खात्यात २६ डिसेंबर २0१५ ला २५ हजार रुपयांची रक्कम जमा केली; मात्र कोणतेही पार्सल त्याला मिळाले नाही. उलट वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असलेल्या खात्यांमध्ये आणखी रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. याबाबतसुद्धा काहीही शहानिशा न करता अडीच कोटीच्या लालसेपोटी त्यांनी विविध खात्यांमध्ये १२ लाख रुपये जमा केले.
यानंतर लॉटरीचे पैसे केव्हा मिळणार? याची विचारणा संबंधितांना केली असता, तुमच्या नावाने आरबीआयमध्ये खाते उघडण्यात आले असून, रक्कम दिल्लीला मिळणार असल्याचे तथाकथीत कंपनीमधील अधिकार्यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार राऊत ११ फेब्रुवारी २0१६ ला दिल्लीला पोहोचले व सुचविण्यात आलेल्या पत्त्यावर कंपनीच्या अधिकार्यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी मात्र त्यांना मोठा धक्का बसला. कारण त्या कंपनीच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतरही अडीच कोटी रुपयाच्या लालसेपोटी त्यांनी पुन्हा सूचविण्यात आलेल्या वेगवेगळ्या खात्यांवर सात लाख रुपये जमा केले. अशाप्रकारे १९ लाख २५ हजार रुपयांचा भरणा केल्यानंतरही लॉटरीची कोणतीही रक्कम मिळत नसल्याने अखेर शिवाजी राऊतने पोलीस स्टेशनला धाव घेतली.
दोन एकर शेतीही विकली
तथाकथीत कंपनीच्या अधिकार्यांकडून वारंवार होणारी पैशाची मागणी पूर्ण केल्यानंतर १२ लाखाची रक्कम जमा केल्यानंतरही आणखी सात लाखांची मागणी करण्यात आली. पैशाची जुळवाजुळव होत नसल्याने राऊत यांनी अखेर नऊ लाख रुपयांत दोन एकर शेती विकली व या रकमेतील सात लाख रुपये पुन्हा विविध खात्यांमध्ये जमा केले आहेत.
तोतया सीबीआय अधिकारीच मुख्य सूत्रधार !
अडीच कोटी रुपये मिळविण्यासाठी १५-२0 लाख रुपये खर्च करण्याची तयारी शिवाजी राऊतने दाखविली. त्यामुळे राऊतचा पूर्ण विश्वास बसावा, यासाठी एकाने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून त्यांना बनावट ओळखपत्रदेखील पाठविले. बर्याच कालावधीनंतर लॉटरीचे पैसे मिळत नसल्यामुळे राऊतने या सीबीआय अधिकार्याची माहिती काढली असता, ओळखपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तोतया सीबीआय अधिकारीच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता वर्तविण्यात येते.