महाडच्या छबिनोत्सवात लाखोंचा भक्तिसागर लोटला

By Admin | Updated: March 2, 2017 03:08 IST2017-03-02T03:08:36+5:302017-03-02T03:08:36+5:30

कोकणात प्रसिद्ध असलेल्या महाडच्या श्री विरेश्वर महाराजांचा छबिनोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

Lots of millions of Bhakti Sagar lootla in Mahad's Chhabinotsala | महाडच्या छबिनोत्सवात लाखोंचा भक्तिसागर लोटला

महाडच्या छबिनोत्सवात लाखोंचा भक्तिसागर लोटला


महाड : संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या महाडच्या श्री विरेश्वर महाराजांचा छबिनोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या या उत्सवाची लळिताच्या कीर्तनाने बुधवारी सकाळी सांगता झाली.
महाडकरांचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराजांच्या या छबिना उत्सवानिमित्त भरलेल्या यात्रेला लाखो भाविकांची उपस्थिती लाभली होती. मंगळवारी रात्रीपासून तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामदेवता आपल्या लाडक्या विरेश्वराच्या भेटीला पालखीने वाजत-गाजत येतात. त्यात विन्हेरेच्या श्री झोलाई देवीचे आगमन महत्त्वपूर्ण मानले जाते. मध्यरात्री विन्हेरच्या झोलाई देवीचे ढोल-नगाऱ्याच्या निनादात स्वागत करण्यात आले. त्यानंतर विरेश्वर मंदिरात गोंधळ व अन्य धार्मिक विधी पार पडल्यानंतर सर्व देवदेवता व विरेश्वर महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मध्यरात्रीनंतर पहाटे निघालेल्या मिरवणुकीत सासण काठ्या नाचवण्याचा क्षण मोठे आकर्षण ठरला. गाडीतळ परिसरात भरलेल्या यात्रेत उंचच उंच आकाश पाळणे, टोराटोरासह मौत का कुआँ आदी मनोरंजनाची साधने व मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी दुकाने थाटण्यात आलेली होती. विरेश्वर मंदिरात तर दर्शनासाठी भाविकांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे दिसून आले.
उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी डीवायएसपी प्रांजली सोनावणे-पोळ यांच्या मार्गदर्शानाखाली पो. नि. रवींद्र शिंदे, के. टी. गावडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात तैनात होते. देवस्थानचे सरपंच दिलीप पार्टे, छबिना उत्सव समितीचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह विश्वस्त व उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Lots of millions of Bhakti Sagar lootla in Mahad's Chhabinotsala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.