जिल्हा बँकेमुळेच ‘वसंतदादा’चे नुकसान
By Admin | Updated: November 27, 2014 23:52 IST2014-11-27T23:07:42+5:302014-11-27T23:52:13+5:30
विशाल पाटील : कारखान्याच्या प्रकल्पाला बँकेचा फटका

जिल्हा बँकेमुळेच ‘वसंतदादा’चे नुकसान
सांगली : जिल्हा बँकेचा सीआरएआर (कॅपिटल टू रिस्क वेटेड अॅसेटस् रेश्यू) दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळेच ‘हुडको’कडून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कर्ज मिळू शकले नाही. याशिवाय बॅँकेने चांगला सीआएआर असलेल्या बॅँकेची गॅरंटी मिळवून न दिल्यानेच हा कर्जप्रकल्प रद्द झाला, अशी माहिती वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी आज (गुरुवारी) दिली.
ते म्हणाले की, ज्यावेळी या वीजनिर्मिती प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव हुडकोला सादर झाला, त्यावेळी त्यांनी सक्षम बॅँकेकडून बॅँक गॅरंटी मागितली होती. आमचे खाते जिल्हा बॅँकेत असल्यामुळे त्यांच्याकडेच याबाबतची मागणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. जिल्हा बॅँकेने स्वत:ची कौंटर गॅरंटी दिली. त्यांचा सीआरएआर कमी असल्याने हुडकोने आक्षेप घेतला. त्यानंतर जिल्हा बॅँकेने राज्य बॅँकेची गॅरंटी दिली. वास्तविक राज्य बॅँकेचा सीआरएआरही नियमापेक्षा कमी होता. तरीही राज्य बॅँकेने हे प्रमाण दोन वर्षात १० टक्क्यांपर्यंत जाईल, असे सांगितले. त्यामुळे हुडकोने संबंधित गोष्टींसाठी थोडी मुदत दिली. राज्य बॅँकेच्या सीआरएआरचे प्रमाण तसेच राहिल्याने अखेर हुडकोने हा प्रकल्प रद्द केला.
जिल्हा बॅँकेने ठरविले असते तर, त्यांनी सक्षम बॅँकेची गॅरंटी कारखान्याला मिळवून दिली असती. तरीही त्यांनी राज्य बँकेचीच गॅरंटी दिली. ज्या कामापोटी बॅँक गॅरंटी शुल्क दिले होते, ते कामच रद्द झाल्याने गॅरंटी शुल्क परत घेणे, हा आमचा अधिकार आहे. राज्य बॅँकेने लगेचच याबाबतची अंमलबजावणी केली. वास्तविक कारखान्यामुळे बँकेचे नव्हे, तर बॅँकेमुळे कारखान्याचे नुकसान झाले आहे. वीजप्रकल्प पूर्ण झाला असता, तर आता कारखान्यासमोरील अनेक अडचणी दूर झाल्या असत्या, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)