अपघातात नुकसान; बस जप्तचे आदेश
By Admin | Updated: October 14, 2014 23:25 IST2014-10-14T22:45:14+5:302014-10-14T23:25:27+5:30
वाहन अपघात खटल्यातील ही पहिलीच घटना ठरली.हुबळी आगाराची बस : न्यायालयाचे आदेश

अपघातात नुकसान; बस जप्तचे आदेश
इस्लामपूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येलूर (ता. वाळवा) नजीक एकास ठोकरुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी येथील न्यायालयाने नुकसानभरपाई देण्याचा आदेश कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या हुबळी आगारास दिला होता. मात्र नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने येथील न्यायालयाने आज (मंगळवारी) या आगाराची एसटी बस जप्त करण्याची कारवाई केली. बस जप्त करण्याची वाहन अपघात खटल्यातील ही पहिलीच घटना ठरली.अडीच वर्षांपूर्वी ४ जून २०१२ रोजी हुबळी आगाराच्या एसटी बसने (क्र. केए २६ एफ ८३८) गुलजार बापूसाहेब ढगे यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. मुसा ढगे यांनी कुरळप पोलिसांत वर्दी दिली होती. पोलिसांनी एसटी बस चालकाविरुध्द गुन्हा नोंद केला होता.
या अपघाताची सुनावणी इस्लामपूरच्या न्यायालयात सुरु होती. सुनावणीदरम्यान हुबळी आगाराला नुकसान भरपाई म्हणून ५० हजार ८८० रुपये भरण्याची नोटीस बजावली होती. मात्र आगाराने ही नुकसानभरपाई भरली नव्हती. त्यामुळे फिर्यादीतर्फे अॅड. एस. आर. पाटील-ढवळीकर यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यावर, आजच न्यायालयाने हुबळी आगाराची बस जप्तीचे आदेश काढले. न्यायालयातील बेलिफांनी पेठनाका येथे थांबून हुबळी आगाराची बस (क्र. केए २५ एफ ३०२४) जप्त केली. (वार्ताहर)