मान्सूनला खोडा ‘एल निनो’चा
By Admin | Updated: June 23, 2014 04:29 IST2014-06-23T04:29:44+5:302014-06-23T04:29:44+5:30
यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव पडत असून त्यामुळे राज्यासह देशभरात अपुरा पाऊस पडला आहे.

मान्सूनला खोडा ‘एल निनो’चा
पुणे : यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव पडत असून त्यामुळे राज्यासह देशभरात अपुरा पाऊस पडला आहे. पुणे वेधशाळेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दरवर्षीच्या तुलनेत यंदा १८ जूनपर्यंत ४५ टक्के पाऊस कमी पडला आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनवर एल निनोचा प्रभाव पडणार नसल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून अल निनोची स्थिती निर्माण होत असून हा एल निनोच्या प्रभावामुळेच पाऊस कमी पडत असल्याचे तज़्ज्ञांनी शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, एल निनोच्या प्रवाहाची ही सुरुवातीची स्थिती आहे. तो पूर्णपणे विकसित होण्यास आणखी चार महिने लागतील आणि तोपर्यंत मान्सून संपलेला असेल. त्यामुळे या घटकाचा फारसा परिणाम होणार नाही, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे.
जून महिन्याच्या २० तारखेपर्यंत दरवर्षी देशभरात ८७.६ मिलीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत तो फक्त २८.७ मिलीमीटर झाला आहे. अलनिनोचा प्रभाव कायम राहिल्यास जून-जुले महिन्यात खूपच कमी पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. यंदा पाऊस कमी झाल्यास शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. अगोदरच कमी पाऊस असलेल्या ठिकाणी पाऊसच पडला नाही तर दुष्काळाचे संकट ओढवू शकते. त्यामुळे हवामानतज्ञांचे डोळे समुद्राच्या स्थितीवर रोखले गेले आहेत. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मॅनेजमेंट’च्या अभ्यासानुसार, पश्चिम घाटावरील परिस्थिती मान्सूनच्या वाटचालीस पूरक ठरेल आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात मध्य भारतामध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होईल. (प्रतिनिधी)