मुद्रांक विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
By Admin | Updated: June 23, 2014 04:12 IST2014-06-23T04:12:00+5:302014-06-23T04:12:00+5:30
कल्याण येथील तहसीलदार कार्यालयात १०० रुपयांच्या मुद्रांकावर सत्यप्रतिज्ञापत्र लिहून देण्यासाठी स्टँप व्हेंडर ग्राहकांकडून ४०० ते ४५० रुपये घेत

मुद्रांक विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
राजेंद्र वाघ, शहाड
कल्याण येथील तहसीलदार कार्यालयात १०० रुपयांच्या मुद्रांकावर सत्यप्रतिज्ञापत्र लिहून देण्यासाठी स्टँप व्हेंडर ग्राहकांकडून ४०० ते ४५० रुपये घेत असून, सध्या ग्राहकांची सर्रास लूट करीत आहेत. मात्र ग्राहकांच्या तक्रारीनंतरही शासन ही लूट थांबविण्याबाबत हतबल झाले असल्याचे दिसते.
बारावी आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जातीचा दाखल, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेयर आदी दाखले मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात विद्यार्थी व पालक यांची मोठी गर्दी होत आहे. याशिवाय जर शाळा सोडल्याचा मूळ दाखला हरविल्यास, जात पडताळणी प्रमाणपत्र, नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठी, शेतीच्या सातबारावरील नावे कमी अधिक करण्यासाठी, विजेचे मीटर नावावर करण्यासाठी व अपत्याचा दाखला यापैकी बहुतांश दाखले अथवा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी १०० रुपयांच्या मुद्रांकावर सत्यप्रतिज्ञापत्र लिहून त्याचे नोटरी करून द्यावे लागते. सध्या मात्र अशी सत्यप्रतिज्ञा लिहून व नोटरी करून आणणारे दस्तलेखक (स्टॅम्पव्हेंडर) ग्राहकांकडून ४०० ते ४५० रुपये उकळत आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता १०० रुपयांचा मुद्रांक असेल तर लिहिण्याचा खर्च व नोटरी करून देणाऱ्या वकिलाची फी किती, याबाबत मात्र दस्तलेखक काहीही बोलायला तयार नाहीत़ असे असले तरी तहसीलदार कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सत्यप्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी २०० रुपयांपेक्षाही कमी खर्च येत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे दस्तलेखकांकडून सध्या ग्राहकांची मनमानी पद्धतीने सर्रास लूट सुरू असून त्यांच्यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे.
अनधिकृत मुद्रांक विक्रेत्यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण काढण्याबाबत मी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पत्र दिले आहे. तेव्हा लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तर ग्राहकांची लूट करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. फक्त ग्राहकांनी आम्हाला योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी केले आहे. (वार्ताहर)