बाबासाहेबांची वैचारिक चळवळ चालविण्याचा ध्यास घ्या!
By Admin | Updated: February 15, 2016 02:12 IST2016-02-15T02:12:14+5:302016-02-15T02:12:14+5:30
अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे आवाहन.

बाबासाहेबांची वैचारिक चळवळ चालविण्याचा ध्यास घ्या!
विवेक चांदूरकर/वाशिम: जिल्हय़ात आयोजित ३३ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन अत्यंत उत्कृष्ट पार पडले असून, एवढय़ावरच न थांबता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक चळवळ चालविण्याचा ध्यास घ्या, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रजत वर्षाला सर्मपित शहरातील अकोला नाका परिसरातील जैन भवन येथे १४ फेब्रुवारी रोजी ३३ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रविचंद्र हडसनकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, माजी आमदार सुरेश इंगळे, राजेंद्र अहिरे, पीरिपाचे प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे, मधुकर जुमडे, डॉ. सिद्धार्थ देवळे, माजी आमदार खडसे, डॉ. कृष्णा किरवले, दौलत हिवराळे, सिद्धार्थ जुमळे, शांताबाई मोरे, विलास कटारे, हरिश्चंद्र पोकळे, खा. की. वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. गंगाधर पानतावणे म्हणाले, की अस्मितादर्श साहित्य संमेलन म्हणजे कार्यशाळा असते. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचे गांभीर्य मांडण्यात येते. आमचं साहित्य मनोरंजनासाठी नसून, रंजनवादी साहित्याचे बोट कधीच न धरता बाबासाहेबांच्या वैचारिक धनाकडे वळा, असा सल्लाही त्यांनी नवोदित साहित्यिकांना दिला. बाबासाहेबांचे मूलभूत विचार मांडण्यासाठीच अस्मिातादर्श चळवळ सुरू झाली. अस्मितेचा आरसा म्हणजे अस्मितादर्श असून, ही चळवळ सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संयोजन समितीतील पदाधिकारी व या संमेलनाच्या आयोजनासाठी झटत असलेल्यांचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये संयोजन समितीचे पा. उ. जाधव, महेंद्र ताजणे, शेषराव धांडे, अनंत जुमळे, अरविंद उचित यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्मरणिकेचे संपादक प्रा. मोहन सिरसाट व दीपक ढोले यांचाही सत्कार करण्यात आला. आंबेडकरी चळवळीत योगदान देणार्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. संचालन अनंतकुमार जुमडे यांनी केले तर आभार महेंद्र ताजने यांनी मानले. यावेळी विविध ठरावांचेही वाचन करण्यात आले.