लोणी काळभोरला अडीच कोटी पकडले
By Admin | Updated: October 11, 2014 05:33 IST2014-10-11T05:33:20+5:302014-10-11T05:33:20+5:30
शिरुर मतदार संघामधील भरारी पथकाने कवडीपाट टोल नाक्यावर वाहन तपासणीदरम्यान अडीच कोटींची रक्कम पकडली

लोणी काळभोरला अडीच कोटी पकडले
पुणे : शिरुर मतदार संघामधील भरारी पथकाने कवडीपाट टोल नाक्यावर वाहन तपासणीदरम्यान अडीच कोटींची रक्कम पकडली. ही रक्कम पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे संबंधितांनी भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. लोणी काळभोर पोलीस प्रकरणाची शहानिशा करीत असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी उदय भोसले यांनी दिली.
जीपसोबत बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि पाच शिपाई होते. पोलिसांनी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असून शनिवारी संबंधित अधिकारी तपास करतील. राज्यातील आठ कोटींपैकी साडेपाच कोटींची रोकड एकट्या पुणे जिल्ह्यात पकडली गेली आहे.
घनदाट यांच्यावर गुन्हा
पूर्णा तालुक्यात दोन ठिकाणी तर गंगाखेड शहरात एका ठिकाणी पोलिसांनी १ लाख ६६ हजार रुपये जप्त केले. मतदारांना आर्थिक प्रलोभन दाखविण्याचा प्रकार शुक्रवारीही येथे समोर आला.
गौतम हत्तीअंबिरे, जालिंदर हत्तीअंबिरे, असदखाँ महेमूदखाँ पठाण, लालखाँ अशरफखाँ यांनी अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांनाच मतदान करावे, यासाठी मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी ९८ हजार रुपये जवळ बाळगले. सीताराम घनदाट यांच्यासाठी मतदारांना प्रत्येकी ५०० रुपयांचे प्रलोभन दाखविताना ४३ हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले. या प्रकरणी आ. सीताराम घनदाट यांच्यासह त्यांच्या पाच कार्यकर्त्यांविरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गंगाखेडमध्ये पैसे वाटप
गंगाखेड शहरातील मोमीनपुरा येथे मतदारांना पैसे वाटप करीत असताना देवीकांत संजय साळवे (रा. महात्मा फुलेनगर) यांच्याकडून २५ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. त्यांना अटक झाली आहे. देवीकांत मतदारांना सीताराम घनदाट यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करताना आढळून आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)