लंडनचा अभियंता पोहोचला सायकलवरून थेट साताऱ्यात!
By Admin | Updated: April 28, 2016 00:20 IST2016-04-27T23:01:01+5:302016-04-28T00:20:54+5:30
भारतभ्रमण : आज साताऱ्यातून कोकण दर्शनासाठी करणार कूच

लंडनचा अभियंता पोहोचला सायकलवरून थेट साताऱ्यात!
सातारा : खरंतर पेशानं इंजिनिअर असणारी माणसं यंत्रतंत्रात जास्त रमतात. मात्र, लंडन येथील एक इंजिनिअर चक्क भारतीय खेड्यांच्या प्रेमात पडला आहे. म्हणूनच तो सायकलवरून भारतीय ग्रामजीवनाचा अनुभव घेत साताऱ्यात पोहोचलाय. गुरुवारी सकाळी तो साताऱ्यातून महाबळेश्वराकडे कूच करणार असून पुढे तो सायकलवरून कोकणभ्रमंती करणार आहे.
ब्रायन अॅटवूक हे लंडन येथे इंजिनिअर आहेत. सायकलवरून फिरण्याची त्यांना प्रचंड आवड आहे. या छंदापायी ते लंडनहून सुरुवातीला श्रीलंकेत आले. त्याठिकाणी सायकलवरून ते फिरले. आता ते भारतात आले असून संपूर्ण भारतभर ते सायकलवरून फिरणार आहेत. त्यांचा सायकलप्रवास मदुराईपासून सुरू झाला असून पुढे हिमालय, नेपाळपर्यंत ते फिरणार आहेत. सध्या ते सातारा शहरात पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांचा मुक्काम असून गुरुवारी सकाळी सहा वाजता ते मेढा मार्गे कोकणात जाणार आहेत. सातारा सायकलिंग गु्रप त्यांना मेढ्यापर्यंत सोबत करणार आहे, अशी माहिती आशिष जेजुरीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
खेड्यातून प्रवास करत असताना सायकलवरून शाळेत जाणारी मुलं पाहून आनंद झाला. पण शहरात मात्र सायकल कुठे दिसत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. काश्मिर, हिमालयात संपूर्ण उन्हाळा घालविणार असून पुन्हा दिल्लीतून राजस्थान असा सायकल प्रवास करणार आहेत. त्यानंतर पुन्हा नेपाळला विमानाने जाऊन त्याठिकाणी सायकलवरून फिरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
खेड्यातील पाहुणचारानं भारावलो...
कोणत्याही देशात सायकलवरून प्रवास करताना सुरक्षेचा प्रश्न असतो. भारतातील खेड्यांमध्ये सायकलवरून प्रवास करत असताना येथील लोकांनी असुरक्षितता कधी जाणवू दिली नाही. खेड्यातील लोकांनी केलेल्या पाहुणचारामुळे भारावून गेलो. हाच जिव्हाळा लोकांनी आपल्या माणसांबरोबरही जपावा, अशी प्रतिक्रिया अॅडवूड यांनी व्यक्त केली.
हायवेपेक्षा गावातून फिरायला आवडतं...
भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे खेडेगावातून फिरल्याशिवाय खरा भारत कळणार नाही. यासाठी हायवेवरून न फिरता खेडेगावातून प्रवास असल्याचे ब्रायन अॅटवूड यांनी सांगितले.
वाहतुकीचे नियम पाळायला हवेत
भारतभर फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली की, येथील वाहनचालक वाहतुकीचे नियम फारसे पाळत नाहीत. अपघातमुक्त प्रवास करायचा असेल तर प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.