लोणार सरोवर परिसरात बिबट्यासह 3 छाव्यांचे वास्तव्य, पर्यटक भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 20:39 IST2016-08-27T20:39:53+5:302016-08-27T20:39:53+5:30
खा-या पाण्याच्या सरोवर परिसरातील वन्यजीव अभयारण्यात बिबट्याच्या अस्तित्वामुळे अभयारण्याच्या प्राणी वैभवात भर पडली आहे

लोणार सरोवर परिसरात बिबट्यासह 3 छाव्यांचे वास्तव्य, पर्यटक भयभीत
>- मयूर गोलेच्छा / ऑनलाइन लोकमत
लोणार, दि. 27 - खा-या पाण्याच्या सरोवर परिसरातील वन्यजीव अभयारण्यात बिबट्याच्या अस्तित्वामुळे अभयारण्याच्या प्राणी वैभवात भर पडली आहे. पर्यटक मात्र भयभीत झाले असून, सरोवर परिसरात बिबट्याचा मुक्त संचारामुळे पर्यटकांना तसेच नागरिकांना जीव मुठीत धरून सरोवरातील कमळजा देवीच्या दर्शनाला जावे लागणार आहे.
सरोवर परिसरातील घनदाट जंगलात मोर, निलगाय, तडस, विषारी साप, अजगर, सायाळ, हरण, ससे, घोरपड, विविध प्रकाराचे पक्षी यासह अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व असल्यामुळे २००२ साली वनविभागाने लोणार सरोवराला राज्यातील सर्वात छोटे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले. लोणारच्या अभयारण्यात मोरांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर असून सकाळी आणि सायंकाळी सरोवर काठावर मोरांचा मुक्त संचार पहावयास मिळतो. मात्र गेल्या पाच वर्षात शिकाºयांनी मोरांना आपले लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर मोरांची शिकार केल्याने सरोवरातील मोरांची संख्या घटली आहे. आता मात्र अभयारण्यात बिबट्याच्या अस्तित्वामुळे प्राणी वैभवात एक प्रकारे भर पडली आहे. लोणार वन्यजीव अभयारण्यात नरमादी बिबट्यासह त्यांचे ३ छावेही असल्याने लोणारच्या अभयारण्यातही वन्यप्राणी राहू शकतात. वनविभागाने अभयारण्यातील वन्यप्राणी आणि पक्षांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.