लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; सामाजिकतेची जाणिव असणाऱ्या उद्योगभास्करांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 04:50 PM2018-03-23T16:50:25+5:302018-03-23T18:15:24+5:30

नव्या पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्याची संधी लोकमत महाराष्ट्रियन ऑफ दि इयरच्या निमित्ताने मिळणार आहे.

Lokmat Maharashtrian of the Year; Respect for socially recognized industrialists | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; सामाजिकतेची जाणिव असणाऱ्या उद्योगभास्करांचा सन्मान

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; सामाजिकतेची जाणिव असणाऱ्या उद्योगभास्करांचा सन्मान

Next

मुंबई- बांधकाम असो वा खाद्यउद्योग प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या, नव्या पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्याची संधी लोकमत महाराष्ट्रियन ऑफ दि इयरच्या निमित्ताने मिळणार आहे, उद्योग विभागातील नामांकने पुढील प्रमाणे आहेत.

आकाश भोजवानी, उद्योजक - संचालक, भोजवानी फूडस् लिमिटेड, नागपूर
आकाश भोजवानी, वय वर्षे २५. अवघ्या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी आपल्या यशाचा गाडा सुसाट पळवत भोजवानी फूडस् लिमिटेड या आपल्या कंपनीला यशोशिखरावर नेऊन ठेवले आहे. भोजवानी फूड लि.चे ते संचालक आहेत. प्रबळ आत्मविश्वास ही त्यांची जमेची बाजू आहे. अनेक वेळा त्यांना कंपनी प्रौढाची भूमिका घ्यावी लागते. कारण अनेक कर्मचारी हे त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठे आहेत. ते म्हणतात, व्यवसायातील प्रत्येकाचा आदर केलाच पाहिजे कारण कल्पना, विचार हे कुणाकडूनही येऊ शकतात. येथे वयाचा संबंध नसतो. आकाश जर त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात आले नसते तर कदाचित ते रोबोटस् बनवीत राहिले असते. पण पिढीजात व्यवसायात त्यांनी स्वत:ला झोकून दिले.आकाश यांच्या नसानसात उद्योजकता भिनली आहे. त्यांचे आजोबा होटचंद भोजवानी यांनी ५० वर्षांपूर्वी इतवारीत पिठाची गिरणी सुरू केली होती. त्यानंतर १९८४ मध्ये त्यांच्या वडिलांनी या व्यवसायाला वेगळे वळण देऊन मसाले आणि धान्याचा किरकोळ व्यापार सुरू केला. आकाश यांनीही आपल्या वडिलांचाच हा व्यवसाय पुढे चालू ठेवला व त्याचा विस्ताार केला. सुरुवातीला वाट खडतरच होती. सुरुची मसाले, एमडीएचसारखे मोठे स्पर्धक त्यांच्यापुढे होते. त्यांचे आक्रमक किंमत धोरण, त्यावेळी भोजवानी फूडस्ची विक्रीही जेमतेमच होती. पण आकाश डगमगले नाहीत. यांनी स्पर्धात्मक किमतीत उच्च दर्जाची उत्पादने देणे सुरू केले. आजमितीला आकाशजींचा व्यवसाय ११ राज्यात विस्तारला आहे. नवी दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे त्यांनी झेंडा रोवला आहे. कापसी येथील त्यांच्या भव्य वास्तूतून कॉर्पोरेट ग्राहकांना धान्य व डाळींचा थेट पुरवठा होतो. नागपूरव्यतिरिक्त भंडारा येथेही एक प्रकल्प स्थापन करण्यात आला असून त्यासाठी जर्मनीहून यंत्रसामुग्री येणार आहे. कंपनीचे नागपुरात सात डिस्ट्रिब्युटर्स असून आणि एक हजार रिटेल स्टोअर्समध्ये त्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. विदर्भात भोजवानी फूड लि. चे ६५, महाराष्ट्रात १४० आणि संपूर्ण देशात ८५० डिस्ट्रिब्युटर्स आहेत. एकट्या मुंबईत २२ आहेत. तंत्रज्ञान कोणत्याही व्यवसायाचा चेहरामोहरा बदलवू शकते, यावर आकाश यांचा ठाम विश्वास आहे. त्यांनी पुणे अ‍ॅप्टेकमधून रोबोटिक्समध्ये डिप्लोमा घेतला आहे. स्थानिक लोकांच्या गरजेनुसार ज्या कंपन्या आपल्या उत्पादनात बदल करतात त्यांचेच अस्तित्व कायम राहते. म्हणूनच आकाश भोजवानी यांनी आपल्या विस्तारित योजनेत उपवासाची इडली आणि उपवासाचा ढोकळा यांचा आपल्या उत्पादनात समावेश केला आहे. एक धोरण म्हणून कंपनी आपले कोणतेही उत्पादन विदेशात पाठवित नाही. अमेरिकेत तेथील गरजेनुसार उत्पादन करण्यासाठी एक युनिट तेथे स्थापन होत आहे असे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आकाश यांचे मोठे योगदान आहे. लंडन स्कूल ऑफ एकॉनॉमिस्टमध्ये त्यांनी उन्हाळी सत्र केले आहे. आकाश विद्यार्थ्यांना व्यवसायाचे धडे देतात व आपले अनुभव कथन करतात. उद्योजकांच्या विविध व्यासपीठावर ते व्याख्यान देतात. रोटरी क्लब (नागपूर ईशान्य) चे सदस्य या नात्याने ते जलसंवर्धन मोहिमेत सक्रीय सहभाग घेतात. आज त्यांच्या उद्योगात ५०० जणांना प्रत्यक्ष आणि १००० हून अधिक लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळाला आहे. भारताच्या खाद्यान्न क्षेत्रात त्यांच्या कंपनीने आपले नाव प्रस्थापित केले आहे.
आकाश भोजवानी यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

राहुल धूत, धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड
औरंगाबादच्या धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड आणि मंगलम कॉइल्सचे युवा संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक असलेले राहुल धूत हे अचुकतेच्या जिद्दीसाठी ओळखले जातात. केवळ १७ वर्षांच्या कालावधित त्यांचा समूह आॅटमोटीव्ह इलेक्ट्रॉनिक्स, वायरिंग, पॉवर वायरी, कॉपर वायर्स, केबल्स, कपलिंग्स आणि स्वीच यांचा देशातील महत्त्वाचा पुरवठादार ठरला. हा समूह विदेशातील ऑटोमोबाइल उत्पादक आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनाही वस्तुंचा पुरवठा करण्याच्या क्षेत्रातही प्रसिद्ध आहे. धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच डीटीपीएलची स्थापना २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर १९९९-२००० मध्ये झाली. कंपनीचे औरंगाबाद, दिल्ली, पुणे आणि चेन्नई येथे उत्पादन युनिट्स असून त्यामधील रोजगार ३ हजारहून अधिक आहे. २०१७ मध्ये डीटीपीएलने स्कॉटलंड येथील टीएफसी कंपनी ताब्यात घेतली. त्याचे उत्पादन युनिट स्लोवाकियात आहे. अमेरिकेतील कार्लिंग टेक्नॉलॉजीस या कंपनीशीही डीटीपीएलने संयुक्त करार केला आहे. २००१ मध्ये केवळ ६० लाख रुपये उलाढाल असलेल्या डीटीपीएलचा आज वार्षिक व्यवसाय ८०० कोटी रुपयांच्या वर गेला आहे. औरंगाबादच्या शेंद्रा व इंदूरजवळील पिथमपूर येथील विशेष आर्थिक क्षेत्रात कंपनीचे निर्यात युनिट आहे. राहुल धूत हे स्वत: इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात बीई झाले आहेत. आतापर्यंत विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सीआयआयसह अनेक महत्त्वाच्या उदद्योग संघटनांशी ते संलग्न आहेत. 
राहुल धूत यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

राहुल नहार, अध्यक्ष, एक्झर्बिया डेव्हलपर्स, लि. मुंबई
परवडणाऱ्या दरातील घरे तसेच आलीशान आणि संकल्पनेवर आधारित घरांच्या व गृहनिर्माण प्रकल्पांच्या उभारणीत अग्रगण्य विकासक कंपनी म्हणून राहुल नहार यांची एक्झर्बिया डेव्हलपर्स लि. कंपनीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सध्या देशात परवडणाºया दरातील घरांच्या निवाºयासाठीची चर्चा जोरात आहे. मात्र ही चर्चा जरी सध्या सुरु असली तरी नहार यांची कंपनी या विषयावर २००४ पासूनच काम करत आली आहे. घरांचे स्वप्न पूर्ण होईल अथवा कसे या विवंचनेत असलेल्या लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम एक्झर्बिया डेव्हलपर्स लि. सुरुवातीपासूनच केले आहे. याचसोबत, ग्राहकांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार कस्टमाईजड् घरांची बांधणी करणे, व्हीला अथवा बंगले या क्षेत्रातही कंपनीने मोठे काम केले आहे. कमर्शियल इमारतींच्या बांधकामातही कंपनीचा मोठा लौकिक आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यात असून पुणे व मुंबईसोबत अनेक ठिकाणी ही कंपनी आज कार्यरत आहे. 
राहुल नहार यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

संजय घोडावत, अध्यक्ष, संजय घोडावत समूह, कोल्हापूर
‘संजय घोडावत समूह’ या भव्य उद्योग साम्राज्याचे नेतृत्व स्वत: संजय घोडावत सक्षमपणे करतात. एफएमसीजी उत्पादनांपासून ते शिक्षण तसेच पवन उर्जेसाठीच्या टर्बाइनची निर्मिती अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या या समुहात ७ हजारहून अधिक कर्मचारी आहेत. संजय घोडावत यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला तसेच ते परवानाधारक वैमानिकही आहेत. जयसिंगपूर येथील सुशीला धनचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे हे प्रमुख आहेत. त्यांनी १९९३ मध्ये कंपनीची स्थापना केली. त्यानंतर कोल्हापुरात शिक्षण संस्था आणि पुण्यात आंतरराष्ट्रीय शाळा, मॅनेजमेंट, इंजिनीअरिंग, मेडिकल अभ्यासक्रम देणारी शिक्षण संस्थाही त्यांनी सुरू केल्या. याच समुहांतर्गत जेईई, विविध सीईटी तसेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मार्गदर्शनही केले जाते. घोडावत एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत १०३ मेगावॉट पवन ऊर्जा व १२ मेगावॉट सौर ऊर्जा निर्मित केली जाते. तब्बल १५१ एकरावर फुल शेती व ३० एकरावर बागायत शेतीचे उत्पादन करणारी घोडावत अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड हे देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. घोडावत फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड एफएमसीजी क्षेत्रात कार्यरत आहे. घोडावत एन्टरप्राइझेस या कंपनीकडे तीन हेलिकॉप्टर्स असून कंपनी देशांतर्गत हवाई सेवा देते. घोडावत यांना उद्यमशीलतेच्या क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी आजवर सन्मानीत करण्यात आले आहे. संजय घोडावत यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

श्रीकृष्ण चितळे, भागिदार, चितळे बंधू मिठाईवाले, पुणे
अस्सल खवय्यांची आवडती पुण्याची खास बाकरवाडी तयार करणारे चितळे बंधू. चितळे बंधुंनी स्वीट्स, स्नॅक्स आणि अन्य खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात स्वत:चे वेगळेपण कोरले आहे. अथक परिश्रम आणि समर्पण हे त्यांच्या यशाचे गमक आहे. चितळेंनी १९५० मध्ये दूध वितरणाचा व्यावसाय सुरू केला आणि आज हा व्यावसाय २०० कोटी रुपयांच्या उलाढालीसह महाराष्ट्रातील विश्वासार्ह समूह म्हणून उभा आहे. चितळे बंधुंची बाकरवाडी केवळ पुणे, महाराष्ट्र किंवा देशातच नाही तर विदेशातही प्रसिद्ध आहे. चितळे बंधूंनी १९७४ मध्ये या बाकरवाडी निर्मितीला सुरूवात केली. हा पदार्थ मूळ गुजराती आहे. त्यासाठी त्यांनी सुरतहून स्वयंपाकी बोलवला. मराठी खाद्य संस्कृतीच्या मसाल्यांमुळे या बाकरवडीला विशेष चव आली आणि ती खवय्यांच्या चांगलीच पसंतीच उतरली. बाकरवडीची मागणी वाढत गेल्यानंतर चितळेंनी खास स्वीडनहून यंत्र बोलवले. त्याद्वारे या बाकरवडीचे उत्पादन होऊ लागले. आज शिवपूर येथे याचे स्वतंत्र उत्पादन युनिट आहे. चितळेंचे श्रीखंड, पेढा, बासुंदी, मसाला करंजी आणि अन्य पदार्थही प्रसिद्ध आहे. श्रीखंडासाठीचा चक्का लोकप्रिय आहे. खाद्यपदार्थांचा दर्जा ही चितळेंची ओळख आहे. श्रीकृष्ण चितळे हे शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत. पुण्याच्या प्रसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासकीय मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. 
श्रीकृष्ण चितळे यांना मत देण्यासाठी - http://lmoty.lokmat.com/vote.php
 

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year; Respect for socially recognized industrialists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.