मुंबई : भारतीय पोलीस सेवा दलातील (आयपीएस) जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एन. अंबिका आणि हर्ष पोद्दार यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं या दोघांना गौरवण्यात आलं आहे. अतिशय सक्षमपणे मुंबईच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या एन. अंबिका. मुंबई पोलीस दलातील 'लेडी सिंघम' म्हणून त्या ओळखल्या जातात. आयपीएस अधिकारी हर्ष पोद्दार यांची गोष्टही प्रेरणादायी आहे. विदेशातील एक उत्तम नोकरी सोडून पोलीस प्रशासनात रुजू होऊन लोकांची सेवा करण्याचा खूप मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि आज एक जिगरबाज अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मुंबईत वरळी येथील भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात आयपीएस अधिकारी हर्ष पोद्दार आणि एन. अंबिका यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच एन. अंबिका यांचं लग्न झाले. पत्नी, सून, आई ते आयपीएसचा त्यांचा हा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. गृहिणीने ठरविले, तर ती चूल आणि मुलशिवाय काहीही करू शकते, हे अंबिका यांनी करून दाखविले. मूळच्या तामिळनाडूच्या खेड्यात जन्मलेल्या अंबिका यांनी उंच भरारी घेत २००९ मध्ये त्या पोलीस दलात दाखल झाल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून अकोला, जळगावमध्ये जिगरबाजपणे सेवा बजावली. पुढे पोलीस अधीक्षक म्हणून हिंगोलीची सुरक्षा पहिली. नाशिकमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून धडाकेबाज कामगिरी बजावल्यानंतर त्या मुंबईत मे २०१६ पासून कार्यरत झाल्या. त्या परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. मात्र नुकतीच त्यांची पोलीस आयुक्तालयात हेड क्वार्टर - २ विभागात बदली करण्यात आली आहे. परिमंडळ ४ मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना अनेक गुंतागुंतीचे गुन्हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागले आहेत. अशा या मर्दानीचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
हे होते परीक्षक मंडळकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर हे परीक्षक मंडळ होतं.