‘लोकमत’च्या पुढाकाराने मिळणार मायेचे छत्र
By Admin | Updated: November 30, 2014 01:25 IST2014-11-30T01:25:57+5:302014-11-30T01:25:57+5:30
क्रूर पित्याच्या कृत्याने मातेच्या ममतेला पारखी झालेल्या पाचपैकी एका चिमुकलीस आता मायेचा आधार मिळणार आहे.

‘लोकमत’च्या पुढाकाराने मिळणार मायेचे छत्र
सोलापूर : क्रूर पित्याच्या कृत्याने मातेच्या ममतेला पारखी झालेल्या पाचपैकी एका चिमुकलीस आता मायेचा आधार मिळणार आहे. महानंदा योगीनाथ चिडगुंपी यांनी बोराळे येथील वाघमारे कुटुंबातील सारिका बाजीराव वाघमारे या दोन वर्षाच्या तान्हुलीस दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतरच सारिकाला ख:या अर्थाने मायेची उब मिळणार आहे. एक सामाजिक बांधिलकी जोपासत ‘लोकमत’ने यासाठी पुढाकार घेतला आहे.
पाच मुली जन्माला आल्या. आता सहावीही मुलगीच होणार. वंशाला दिवा पाहिजे म्हणून पत्नी राणी हिचा पती बाजीराव याने निर्घृण खून केला. दुस:या दिवशी ‘आजोबा सांगा ना हो, आई कधी येणार..’ हे वृत्त वाचून कुमार करजगी यांची कन्या महानंदा योगीनाथ चिडगुंपी या भावुक झाल्या. स्वत:ला मुलगी नसल्याची खंतही त्यांना होतीच. गेल्या अनेक महिन्यांपासून एका निराधार मुलीस दत्तक घेण्याची त्यांची इच्छा होती. पाचपैकी अगदी छोटी असलेल्या सारिकाला दत्तक घेण्याची इच्छा त्यांनी आपले वडील कुमार करजगी यांच्यासमोर व्यक्त केली.
दरम्यान, ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांच्याशी त्यांनी संपर्क साधून आपली संकल्पना मांडली. ‘लोकमत’च्या माध्यमातून या संकल्पनेस अधिक गती मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर संपादक माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करीत सत्कारही केला. यावेळी कुमार करजगी यांच्या कन्या महानंदा योगीनाथ चिडगुंपी, भाग्यश्री रेणू पवार आणि वर्षा रविकिरण विभुते उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
महानंदांचे पाच वर्षापासूनचे होते स्वप्न
महानंदा चिडगुंपी यांना दोन मुलेच आहेत. आपणास मुलगी नसल्याची खंतही महानंदा यांना होतीच. कुठल्या तरी मुलीला दत्तक घेण्याची त्यांची पाच वर्षापासून इच्छा होती. त्यातच ‘लोकमत’मधील वृत्त वाचून त्यांनी छोटय़ा सारिकाला दत्तक घेण्याची संकल्पना आपले पिता कुमार करजगी यांच्यासमोर मांडली आणि ‘लोकमत’च्या माध्यमातून ही संकल्पना तडीस जाईल, अशी अपेक्षा महानंदा चिडगुंपी यांनी व्यक्त केली.