लोकायुक्त कायदा सक्षम करणार

By Admin | Updated: November 3, 2014 00:49 IST2014-11-03T00:49:09+5:302014-11-03T00:49:09+5:30

भ्रष्टाचार विरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकायुक्त कायद्यात बदल करून तो अधिक सक्षम करणार, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.

Lokayukta law will be enacted | लोकायुक्त कायदा सक्षम करणार

लोकायुक्त कायदा सक्षम करणार

मुख्यमंत्र्यांची नागपुरात घोषणा : मिहानला प्राधान्य
नागपूर : भ्रष्टाचार विरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकायुक्त कायद्यात बदल करून तो अधिक सक्षम करणार, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. मतदारांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत त्यामुळे जनतेच्या ऋणात राहणेच मला मान्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नगरागमन झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचे आज शहरात दणदणीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानापुढील त्रिकोणी मैदानात आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. विद्यमान कायद्यानुसार लोकायुक्तांना विशेष अधिकार नाही, त्यामुळे ते भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करू शकत नाही. अधिकारात वाढ करा, अशी मागणी लोकायुक्तांनी यापूर्वीच्या सरकारकडे केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आम्ही लोकायुक्तांच्या कायद्यात बदल करू व लोकायुक्तांना अधिक अधिकार देऊ. त्यामुळे लोकायुक्तांना भ्रष्टाचाराविरुद्ध ठोसपणे कारवाई करता येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी माजी खा. बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, अनिल सोले, कृष्णा खोपडे, नागो. गाणार, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, सुधाकरराव देशमुख, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, प्रमोद पेंडके मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छापर आशीर्वाद दिले. देवेंद्र यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास नक्की होईल, याची खात्री वाटत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मिहानला आता कुणीच रोखू शकत नाही
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मिहान प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिले. या प्रकल्पाच्या राज्य सरकारशी काही समस्या असतील तर त्या तातडीने सोडविल्या जातील आणि केंद्र सरकारच्या संबंधित काही प्रश्न असतील तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने सोडविले जाईल. संपूर्ण विदर्भाचा चेहरामोहरा बदलविण्याची क्षमता असणाऱ्या मिहान प्रकल्पाचा विकास आता कुणीही थांबवू शकणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात सोमवारी तातडीने बैठक बोलाविली असून त्यात सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मिहानबाबत त्वरित निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
हे देवेंद्रचे नव्हे ‘लोकांचे सरकार’
हे सरकार माझे किवा भारतीय जनता पक्षाचे नाही तर ते जनतेचे सरकार आहे, असे फडणवीस म्हणाले. माझ्यावर खूप अपेक्षांचे ओझे आहे आणि त्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी मी स्वत:ला झोकून देईन. लोकांच्या विश्वासामुळेच मी या पदावर पोहोचू शकलो. लोकांच्या विश्वासाला ठेच पोहोचेल अशी कुठलीही कृती माझ्या हातून घडणार नाही. जनतेला मान खाली घालावी लागेल असे कुठलेही कृत्य माझ्या हातून घडणार नाही. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मला मोहित करू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी भेटलो, तेव्हा त्यांनी ‘सरकार वाचविण्यासाठी चालवू नका. तुम्ही काम करा. सरकार जनताच वाचवेल’ असे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनात मी जनतेचेच काम करीत राहीन. टष्ट्वेण्टी-२० मध्ये प्रत्येक बॉल आणि ओव्हर महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणे प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानून मी जनतेचे प्रश्न सोडविणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: Lokayukta law will be enacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.