चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मला धडकून ५ जखमी
By Admin | Updated: June 28, 2015 18:05 IST2015-06-28T12:42:13+5:302015-06-28T18:05:56+5:30
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एक लोकल धडकून झालेल्या अपघातात मोटरमनसह पाच जण जखमी झाले आहेत.

चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मला धडकून ५ जखमी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एक लोकल धडकून झालेल्या अपघातात मोटरमनसह पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जखमींमध्ये २ पुरूष व ३ महिलांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. प्लॅटफॉर्मला धडकल्याने लोकलचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. चर्चगेट स्थानकाहून विरारच्या दिशेने जाणा-या दोन्ही मार्गावरील ( धिमी व जलद) लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सुदैवाने आज रविवार असल्याने गाडीत व प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी नव्हती व त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून डबा हटवण्याचे काम सुरू आहे. या अपघाता प्रकरणी मोटरमन एल.एफ. तिवारी व गार्ड अजय गोहिल यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान आज झालेला हा अपघात ही पूर्णपणे मानवी चूक असून लोकलचा ब्रेक फेल झाल्याची शक्यता नाही असे पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनीलकुमार सूद यांनी म्हटले आहे.