मुंबई खोळंबली, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा ठप्प
By Admin | Updated: June 19, 2015 13:29 IST2015-06-19T08:18:41+5:302015-06-19T13:29:03+5:30
मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य व हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प पडली आहे.

मुंबई खोळंबली, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा ठप्प
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे अशा तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे.
मुंबई व परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साठले आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला, शीव येथे रुळांवर पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प पडली. तर हार्बर व पश्चिम रेल्वे येथील वाहतूकही पाणी साचल्याने ठप्प पडली. लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांना याचा फटका बसला असून काही एक्सप्रेस गाड्यांचे एसीही बंद पडल्याने प्रवाशांच्या हालात भर पडली आहे. कर्जत, कसारा व कल्याण ते ठाण्यापर्यंतची धीम्या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरु आहे. ठाणे ते सीएसटी पर्यंतची वाहतूक ठप्प पडली आहे. तर हार्बर मार्गावर वाशी - मुंबई सीएसटी, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट - माहीम दरम्यानची वाहतूक बंद पडली आहे. मुंबई मंहापालिकेने शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून अत्यावश्यक कामं असतिल तरच घराबाहेर पडावे असा सल्ला सरकारी अधिका-यांनी दिला आहे. पावसाने जनजीवन विस्कळित झाल्यामुळे शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच न्यायालयाचे कामकाजही बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतला. राजकीय कार्यक्रमही आज रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव व कौल्हापूरला जाणार होते. मात्र, आपत्कालिन स्थिती बघता त्यांनी दौरा रद्द केला आणि मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला.
मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये फडणवीसांनी हजेरी लावली आणि परिस्थितीची माहिती घेतली. दुपारी २.३० वाजता संपू्र्ण भरतीची वेळ असल्याने त्याआधी मुंबईतील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले.
आपत्तीमध्ये भर पडू नये म्हणून मुंबईतील अनेक सखल भागामधील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून परिस्थिती पूर्वपदावर येताच वीजपुरवठा सुरळित करण्यात येणार आहे.