लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता आमीर खान याने घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिस्टर परफेक्शनिस्टने विचारलेल्या प्रश्नांची चौफेर उत्तरे दिली. यावेळी आमीर खान याने अमृता फडणवीस यांच्यासोबत लग्न कसं जुळलं, याबाबतची कहाणी सांगण्याची विनंती केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतच्या मंच्यावरून आपल्या लग्नाची गोष्ट सांगितली. तसेच अमृता फडणवीस यांच्यासोबत लग्न ठरवताना काय काय घडलं तेही सांगितलं.
आपल्या लग्नाची गोष्ट सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी लग्न करायचं असं ठरवलं तेव्हा माझ्या आईने एका विवाह नोंदणी केंद्रात माझं नाव नोंदवलं आणि तिथून काही मुलींचे फोटो आणि इतर माहिती आणून माझ्यासमोर ठेवली. तेव्हा मी अमृताचा फोटो उचलला आणि हिचा नंबर मला हवा आहे असं सांगितलं. त्यानंतर अमृताचा फोन नंबर मिळवला. मला अजूनही आठवतंय की, मी ट्रेनमधून तिला फोन लावला होता. तसेच मी उद्या मी नागपूरला येतोय. आपण उदया भेटू, असे तिला सांगितले.
मी फोन केला त्या दिवशी योगायोगाने तिचा वाढदिवस होता. मात्र ही बाब मला नंतर समजली. नंतर माझ्या एका मित्राच्या घरी आम्ही भेटलो. त्यावेळी आम्ही जवळपास २ तास बोललो. त्यातील एक तास ५० मिनिटे मी बोललो. तर अमृता १० मिनिटे बोलली. मी काय करतो, पुढे काय करायचं आहे, हे मी तिला तेव्हाच सांगितलं. मी पूर्ण जीवनभर राजकारणातच राहणार आहे. कधी कुठला व्यवसाय करणार नाही, कुठला पैसा कमावणार नाही, हेही तिला सांगून टाकले. तेव्हा ती बँकेत चांगल्या पोस्टवर होती. मी तिला सांगितलं की, हे बघ तू नोकरी करते. त्यामुळे तुझा पैसा तुझा. माझा पैसा माझा. मी तुझ्याकडे पैसे मागणार नाही. मात्र मी पैसे मागितले अशी आता ती तक्रार करते, यावर एक वेगळी चर्चाही होऊ शकते, असं करून आमची ती भेट संपली.
नंतर काही दिवस आमच्यात काही संपर्क झाला नाही. एके दिवशी तिचा मला फोन आला. तिने सांगितले की, मी बँकेच्या कामानिमित्त मुंबईत आले आहे. तुम्ही मला भेटायला या. तेव्हा मी अमृताला भेटायला गेलो. तेव्हा आम्ही जवळपास एक सव्वा तास बोललो. यावेळी मात्र ती थोडी जास्त वेळ बोलली. पण साहजिकच मी अधिक बोललो. त्यानंतर पुन्हा आम्ही आपापल्या मार्गाने गेलो. पुन्हा महिनाभर आमच्यात काही संपर्क झाला नाही. त्यानंतर काही दिवसांनी मी अमृताला लाँग ड्राईव्हवर घेऊन गेलो आणि तिचा होकार येईपर्यंत दोन तीन तास तिला फिरवत राहिलो. त्यानंतर थेट गाडी घेऊन आम्ही तिच्या घरी गेलो. तिच्या पालकांना भेटलो. त्यानंतर माझ्या पालकांना भेटलो. अशा प्रकारे ती माझ्याकडे काही मागणार नाही आणि मी तिच्याकडे काही मागणार नाही असं ठरवून आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं. आताही आमचं असंच सुरू आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले की, मी जेव्हा अमृताला पाहिले तेव्हा ती बँकेमध्ये बारा बारा तास काम करायची. तिचं पॅशनच बँक होतं. लग्न झाल्यावर तुझी बँक मुंबईत बदली करून देत असेल तर तू मुंबईत बदली करून घे, असे मी तिला सांगितले. सुदैवाने बँकेने तिला मुंबईत बदली करून दिली. मी मुख्यमंत्री झाल्यावर तिने बँकेला विनंती करून बॅक ऑफिसचं काम देण्यास सांगितलं. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्यासोबत लग्न होईपर्यंत आमदार कोण असतो हे अमृताला माहिती नव्हतं. तिला राजकारणाची काही माहिती नव्हती त्यामुळे तिने माझ्यासोबत लग्न केलं. राजकारणाची माहिती असती तर माझ्यासोबत तिने लग्न केलं असतं की नाही, हे मला माहिती नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Web Summary : Devendra Fadnavis shared his marriage story with Amruta, revealing he chose her photo from a marriage bureau. He proposed on her birthday, emphasizing his commitment to politics and financial independence. After a long drive and parental approval, they had a 'contract marriage'. Amruta's initial lack of political knowledge was a key factor.
Web Summary : देवेंद्र फडणवीस ने अमृता के साथ अपनी शादी की कहानी साझा की, जिसमें बताया कि उन्होंने एक विवाह ब्यूरो से उनकी तस्वीर चुनी। उन्होंने उनके जन्मदिन पर प्रस्ताव रखा, राजनीति और वित्तीय स्वतंत्रता के प्रति अपनी प्रतिबद्धता पर जोर दिया। एक लंबी ड्राइव और माता-पिता की मंजूरी के बाद, उनकी 'अनुबंध शादी' हुई। अमृता की राजनीतिक जानकारी की कमी एक मुख्य कारक थी।