मुंबई - जीवनात तुम्ही जे काही करता त्याचं खरे बक्षीस किंवा पुरस्कार तुम्हाला काय मिळतं यात नाही तर तुम्ही काय बनता यात आहे. ज्यांनी त्यांच्या जीवनात काहीतरी चांगले काम केले आहे. त्यातून त्या व्यक्तीत झालेला बदल हा त्याचा खरा पुरस्कार आहे. जो कुणीही तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही आणि चोरू शकत नाही असं विधान स्वामी ब्रह्मविहारी यांनी पुरस्कार सोहळ्यात केले. आंतरराष्ट्रीय नातेसंबंध जपणाऱ्या स्वामी नारायण संस्थेला महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला.
राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते स्वामी ब्रह्मविहारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी आपल्या मनोगतात ते म्हणाले की, आपण या पृथ्वीवरील सर्वोकृष्ट व्यक्ती असलो तरी जर मी आपल्याला उडी मारायला सांगितलं, तर २ फूट, ३ फूट उडी माराल, ऑलिंपिक चॅम्पियन असाल तर ७ फूट, पोल वॉल्टर असाल तर १९ फूट उडी माराल पण आपण सर्वांनी उडी मारायचं ठरवलं तेव्हा चंद्रावर पोहचलो. अबू धाबीमधील मंदिर मानवतेच्या इतिहासातलं पहिलं मंदिर आहे. तिथे मंदिर होऊ शकत नाही असं मला हजारोंनी सांगितले. परंतु माझ्या अध्यात्मिक गुरूंनी माझ्या कानात सांगितले, एकेदिवशी अबू धाबीत मंदिर होईल. ती कानात सांगितलेली एक कुजबूज हजारो नकारांपेक्षा महत्त्वाची असते असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय मी नगण्य आहे, जगाच्या या प्रक्रियेत मी महत्वहीन आहे. परंतु तुम्ही कुणीही असाल, कुठेही असला तरी तुम्हाला जेवढं काही करता येईल ते करा, जेणेकरून जगाला बदलण्यासाठी ते मदत करेल. मी २०१३ मध्ये पहिल्यांदाच रॉयल माजलीसमध्ये प्रवेश केला. तिथे भगवे कपडे घातलेला साधू आजपर्यंत कुणी इस्लामिक राजाने पाहिला नव्हता. माझ्या आजूबाजूला ५० शेख होते, त्यातील एकाने मला विचारले, तुम्ही भगवे कपडे का घालता? यावर माझ्या मनातलं उत्तर मी त्याला दिले. आम्ही हिंदू आहोत. जेव्हा आमचा मृत्यू होतो तेव्हा आम्हाला पुरलं जात नाही तर दहन केले जाते. त्या अग्नितून आमचं शरीर नष्ट होते, त्याचा रंग केशरी, पिवळा अन् लाल असतो असं मी त्यांना सांगितले.
दरम्यान, जेव्हा तुम्ही जन्माला येता तेव्हा जगण्यासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून असता. बाळाला काय खायचं हे ठरवण्याचा पर्याय नव्हता. काय थंड किंवा गरम हे सांगता येत नव्हते. कपड्यांबद्दल कधीच चिंता किंवा तक्रार नव्हती. तुम्ही जे दिले ते बाळाने स्वीकारले. जेव्हा आपण वृद्ध होऊ तेव्हाही आपण इतरांमुळे जगू. मधल्या काळात आपल्यामुळे इतर जिवंत आहेत असा विचार करतो, परंतु ते खरे नाही. आपण इतरांमुळे जगत असतो, आज मी इथं उभा आहे ते तुमच्या सर्वांमुळे, माझ्या गुरूंमुळे आहे. मी आजचा सन्मान तुमचं प्रेम म्हणून स्वीकारतो असंही स्वामी ब्रह्मविहारी यांनी म्हटलं.