नागपूरच्या ‘ग्रीन कॉरिडोअर’मधून यकृत मुंबईला रवाना
By Admin | Updated: June 24, 2017 15:49 IST2017-06-24T15:49:05+5:302017-06-24T15:49:05+5:30
अवयव दान केल्यानंतर ‘ग्रीन कॉरिडोअर’द्वारे यकृत मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलसाठी शनिवारी दुपारी ३.३० वाजता रवाना करण्यात आले.

नागपूरच्या ‘ग्रीन कॉरिडोअर’मधून यकृत मुंबईला रवाना
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 24 - अवयव दान केल्यानंतर ‘ग्रीन कॉरिडोअर’द्वारे यकृत मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलसाठी शनिवारी दुपारी ३.३० वाजता रवाना करण्यात आले. यासाठी १०० पोलिसांचा ताफा तैनात आहे.
विनायक देशकर (६७) असे अवयवदान करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना गत शुक्रवारी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नागपूरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी पाच दिवसांनी त्यांचा मेंदू मृत झाल्याचे घोषित केले. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार यकृत (लिव्हर) मुंबईला पाठविण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडोअर’ची व्यवस्था करण्यात आली. यासाठी १०० पोलिसांचा ताफा तैनात करून यकृत मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलसाठी दुपारी ३.३० वाजता रवाना करण्यात आले. यकृत बाहेर पाठविण्याची नागपुरातील ही पहिलीच वेळ आहे. यकृतासोबतच दोन किडनी वेगवेगळ्या हॉस्पिटलला देण्यात आल्या. नेत्र हे महात्मे आय बँकला दान करण्यात आले. त्वचा ही ऑरेंज सिटी हॉस्पिटलकडे दान करण्यात आली.