आजी-माजी खासदारांचे जयंतरावांना थेट आव्हान
By Admin | Updated: September 25, 2014 23:26 IST2014-09-25T21:52:23+5:302014-09-25T23:26:19+5:30
इस्लामपूर मतदारसंघ : विरोधकांच्या गोधडीला बळकटी येणार?

आजी-माजी खासदारांचे जयंतरावांना थेट आव्हान
अशोक पाटील - इस्लामपूर -इस्लामपूर मतदारसंघात माजी खासदार प्रतीक पाटील यांनी ‘एन्ट्री’ करून वसंतदादा घराण्यावर वार करणाऱ्या जयंत पाटील यांना नमविण्याचा जणू विडा उचलला आहे. त्यांनी थेट काँग्रेस आघाडीविरोधातील खासदार राजू शेट्टी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जशा आघाडी धर्माला वाटण्याच्या अक्षता लावल्या, तशाच तेही लावत आहेत. मात्र महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांचा कुणाचा पायपोस कुणाला नाही. सध्या विरोधकांची अवस्था फाटलेल्या गोधडीसारखी झाली आहे. ती बळकट होणार का, हा प्रश्न आजतरी अनुत्तरित आहे.
ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधातील सर्वच नेत्यांना एकत्र करून एकास एक लढत देण्यासाठी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पुढाकार घेतला आहे; परंतु उमेदवार कोण, यावर अद्याप एकमत झालेले नाही. मोदींच्या लाटेवर निवडून येण्याच्या मृगजळामागे लागलेले अभिजीत पाटील, बी. जी. पाटील, जितेंद्र पाटील, विक्रमभाऊ पाटील, भीमराव माने यांनी शड्डू ठोकले आहेत, तर जयंतरावांच्या ताकदीपुढे केवळ आपणच साम, दाम, दंड, भेद ही अस्त्रे वापरू शकतो, असे सांगणारे नानासाहेब महाडिक ‘मातोश्री’वरील वाऱ्या करून थकले आहेत. त्यांनी आता राजू शेट्टी आणि प्रतीक पाटील यांनी बांधलेल्या मोटेचा आधार घेणे पसंद केले आहे.प्रतीक पाटील यांच्या ‘एन्ट्री’नंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार यांनी भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रमभाऊ पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार, स्वाभिमानीचे अभिजीत पाटील, बी. जी. पाटील आणि हुतात्मा संकुलाचे वैभव नायकवडी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मात्र त्यांच्यातील विंचूदोषावर आजी-माजी खासदार रामबाण उपाय योजू शकतील का, याबाबत साशंकता आहे. त्यावरच या लढतीची गणिते ठरणार आहेत.
जयंत पाटील --प्रतीक पाटील---राजू शेट्टी
खा. राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात खमक्या उमेदवार म्हणून नानासाहेब महाडिक यांना पसंती दिली आहे. त्यांना महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी शेट्टी यांनीच प्रयत्न सुरू केले, परंतु महायुतीतील घोळामुळे खा. शेट्टी व महाडिक गट मुंबईतून परतले. महायुती तुटल्याने महाडिक यांना ‘स्वाभिमानी’ची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते.