थोडी भीती...थोडे टेन्शन..दहावीची परीक्षा सुरू
By Admin | Updated: March 2, 2016 01:22 IST2016-03-02T01:22:49+5:302016-03-02T01:22:49+5:30
थोडीशी भीती...थोडेसे टेन्शन.. कुठे परीक्षेच्या आधीची विद्यार्थ्यांची उजळणी, तर पालकांनाही थोडीशी धाकधूक. पालक, विद्यार्थ्यांची गर्दी आणि अशा प्रकारचे माहोल दहावीच्या

थोडी भीती...थोडे टेन्शन..दहावीची परीक्षा सुरू
पुणे : थोडीशी भीती...थोडेसे टेन्शन.. कुठे परीक्षेच्या आधीची विद्यार्थ्यांची उजळणी, तर पालकांनाही थोडीशी धाकधूक. पालक, विद्यार्थ्यांची गर्दी आणि अशा प्रकारचे माहोल दहावीच्या प्रत्येक केंद्रावर मंगळवारी दिसत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंगळवारी प्रारंभ झाला. परीक्षेच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थी उत्साही वातावरणात परीक्षेला सामोरे गेली.
शहरातील विविध शाळांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी व पालकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना गुलाब देण्यात आले. पहिला दिवस असल्याने पालक मुलांना परीक्षा केंद्रावर सोडविण्यास आले होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही पेपरच्या आधी तणावात दिसत होते, तर काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला. काही विद्यार्थ्यांनी पेपरनंतर मित्रांशी गप्पा मारून पुढील पेपरच्या तयारीबाबत चर्चा केली, तर काहींनी पुढील पेपरच्या अभ्यासाठी तातडीने घर गाठले. बहुतांश विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालक आले होते. मात्र, शाळांच्या बाहेरच्या रस्त्यांवर गर्दी झाल्याने विद्यार्थ्यांना गर्दीतून वाट काढून बाहेर पडावे लागले.
‘‘पेपरचा सर्व अभ्यास झालेला असल्यामुळे पेपर सोपा गेला. मी सकाळी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचलो. मात्र, विविध ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले असल्याने वाहतूककोंडी झाली होती. पेपर सुटल्यानंतरही परीक्षा केंद्राबाहेर काही काळ वाहतूककोंडी झाली होती’’ असे सिमरन नदाफ या विद्यार्थिनीने सांगितले.