साहित्य संमेलन पिंपरीला
By Admin | Updated: August 10, 2015 01:26 IST2015-08-10T01:26:29+5:302015-08-10T01:26:29+5:30
यंदाचे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड येथे होणार असून, त्याचे यजमानपद

साहित्य संमेलन पिंपरीला
पुणे : यंदाचे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड येथे होणार असून, त्याचे यजमानपद
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीला मिळाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी ही घोषणा केली. घुमानच्या साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यास मराठी साहित्यिक तसेच रसिकांना अनेक अडचणी आल्या होत्या. तसेच पुढच्या महिन्यात होणारे विश्व मराठी साहित्य संमेलनही अंदमान येथे होणार असल्याने महामंडळाने मध्यवर्ती ठिकाणाची निवड केली आहे.
जागेची उपलब्धता, मनुष्यबळ आणि आर्थिक क्षमता या निकषांवरून संमेलनस्थळ निश्चित करण्यात आल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. या वेळी मसापचे कोषाध्यक्ष सुनील महाजन व कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
१२ ठिकाणांहून प्रस्ताव आले होते
पंजाबमधील घुमान येथे गाजलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनानंतर ८९वे साहित्य संमेलन नेमके कुठे होणार याबाबत साहित्य रसिकांमध्ये उत्सुकता होती.
यंदाच्या संमेलनासाठी राज्यभरातून विक्रमी म्हणजेच एकूण १२ ठिकाणांहून प्रस्ताव आलेले होते. त्यातही पिंपरी-चिंचवडमधूनच ३ प्रस्ताव होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावींच्या आशीर्वादाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले.
न भूतो न भविष्यती असे संमेलन करू.
- पी.डी. पाटील, अध्यक्ष, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पिंपरी
लेखक अशा प्रकारे स्वत:च्या बळावर साहित्य संमेलनाची मागणी करतो ही पहिलीच वेळ आहे. पिंपरी व डी.वाय. पाटील यांना ही संधी देण्यामागे नेमके कोणते कारण आहे? अशा प्रकारे महामंडळाने माझी व श्रीगोंदेकरांची निराशा केली आहे. महानगरीच्या गर्दीत कितीवेळा अशा प्रकारे संमेलने करणार? यामध्ये ग्रामीण भागाला कधी संधी मिळणार, हेही पाहिले पाहिजे. पुन्हा याच उत्साहाने संमेलनासाठी मागणी करू,असे वाटत नाही.- राजन खान, लेखक