साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे निधन

By Admin | Updated: December 10, 2014 12:34 IST2014-12-10T12:06:19+5:302014-12-10T12:34:47+5:30

संत - योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही 'बिनधास्त' लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.

Literary Chandrakant Khot passed away | साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे निधन

साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे निधन

>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १० - संत - योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही 'बिनधास्त' लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. बिंब प्रतिबिंब, सन्याशाची सावली हे स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित चरित्रसंग्रह, बिनधास्त, उभयान्वयी अव्यय या त्यांच्या कादंब-या गाजल्या होत्या. 
मराठी साहित्याच्या चौकटीबाहेर जाऊन लिखाण करणारे चंद्रकांत खोत यांचा जन्म ७ सप्टेंबर १९४० रोजी भीमाशंकर येथे झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एमए झाल्यावर त्यांनी पीएचडी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसले तरी त्यांच्याच मुळगावातून येणा-या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएचडी करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती. 
चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून आले. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अन्वय ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली. यानंतर दोन वर्षांनी 'बिनधास्त' आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली 'विषयांतर' ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावरचीच. 'अबकडइ' हे दिवाळी अंकानेही वाचकांवर गारुड घातले होते. बोल्ड विषयांवर कादंबरी लिहील्यानंतर खोत हे अध्यात्मिक साहित्याकडे वळले. गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंबईतील सातरस्ता येथील साईबाबा मंदिरात राहत होते. बुधवारी पहाटे वृद्धापकाळामुळे खोत यांचे निधन झाले. खोत यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रातील बंडखोर लेखक हरपला अशी भावना व्यक्त होत आहे. 
 
चंद्रकांत खोत यांचे गाजलेले चरित्रगंथ 
बिंब प्रतिबिंब - स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारीत चरित्र लेखन. यासाठी खोत यांना कोलकात्यातील भारतीय भाषा परिषदेतर्फे पुरस्कार जाहीर झाला होता व तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते खोत यांचा सत्कार करण्यात आला होता. 
संन्याशाची सावली आणि दोन डोळे शेजारी - स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आणखी एक कादंबरी
अनाथांचा नाथा - साईबाबा यांचे चरित्र
हम गया नही जिंदा है - स्वामी समर्थांवर आधारित चरित्रलेखन
मेरा नाम है शंकर - धनकवडी येथील शंकरमहाराज यांच्या जीवनावर आधारित कादंबरी
गण गण गणात बोते - गजानन महाराजांचे चरित्र
 

Web Title: Literary Chandrakant Khot passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.