साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे निधन
By Admin | Updated: December 10, 2014 12:06 IST2014-12-10T12:06:17+5:302014-12-10T12:06:17+5:30
संत - योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही 'बिनधास्त' लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.

साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे निधन
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - संत - योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही 'बिनधास्त' लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. बिंब प्रतिबिंब, सन्याशाची सावली हे स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित चरित्रसंग्रह, बिनधास्त, उभयान्वयी अव्यय या त्यांच्या कादंब-या गाजल्या होत्या.
मराठी साहित्याच्या चौकटीबाहेर जाऊन लिखाण करणारे चंद्रकांत खोत यांचा जन्म ७ सप्टेंबर १९४० रोजी भीमाशंकर येथे झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढीने खोत थांबले नाही व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एमए झाल्यावर त्यांनी पीएचडी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आले नसले तरी त्यांच्याच मुळगावातून येणा-या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएचडी करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती.