राज पुरोहित आणि वाहतूक पोलिसात शाब्दिक चकमक
By Admin | Updated: September 5, 2016 04:55 IST2016-09-05T04:55:54+5:302016-09-05T04:55:54+5:30
भाजपाचे आमदार राज पुरोहित यांची गाडी पार्किंग करण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसाशी शाब्दिक चकमक उडाली.

राज पुरोहित आणि वाहतूक पोलिसात शाब्दिक चकमक
मुंबई : भाजपाचे आमदार राज पुरोहित यांची गाडी पार्किंग करण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसाशी शाब्दिक चकमक उडाली. ही घटना शनिवारी रात्री पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यासमोर घडली. याबाबत पोलीस ठाण्यात कसलीही नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत सोशल मीडियावरून राज पुरोहित यांनी शिवीगाळ केल्याचे आणि त्यांचा निषेध करणारे संदेश दिवसभर व्हायरल झाले होते, मात्र पुरोहित यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप फेटाळला आहे.
रात्री ८च्या सुमारास एल.टी. मार्ग पोलीस ठाण्याजवळ पुरोहित यांच्या चालकाने कार पोलीस ठाण्यासमोर पार्क केली. त्यामुळे परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊ लागला. त्यामुळे तेथे ड्युटीवर असलेल्या एका पोलिसाने चालकाला गाडी बाजूला लावण्याची सूचना केली. त्यामुळे पुरोहित यांनी गाडीतून बाहेर येत ‘हिंमत असेल तर भेंडी बाजारात जाऊन तेथील वाहतूक सुरळीत करा, मी आमदार आहे. प्रसंगी पोलीस स्टेशनमध्येच गाडी पार्क करेन,’ असे पोलिसाला सांगितले. पुरोहित यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कॉन्स्टेबल गडबडून गेला.
(प्रतिनिधी)
>शिवीगाळ केली नाही
- राज पुरोहित
पिकेट रोडवरील हनुमान मंदिरात दर्शनासाठी आलो होतो. तिथे पार्किंगसाठी जागा असतानाही पोलिसांनी गाडी लावण्यास मनाई केली. असे मनाई करण्याचे कारण काय, या प्रश्नाला पोलिसांना उत्तर देता आले नाही. त्याचवेळी तेथे बाइकस्वार विरुद्ध दिशेने गाडी चालवित होते. भेंडीबाजारमधील आणि अन्य ठिकाणच्या सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळे नियम आहेत का, असा सवाल मी केला, असे राज पुरोहित यांनी स्पष्ट केल.