यादीत नावच नाही, अर्ज कसा भरता?
By Admin | Updated: September 8, 2015 01:14 IST2015-09-08T01:14:22+5:302015-09-08T01:14:22+5:30
आजीव सभासदांच्या यादीत तुमचे नाव नाही, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरता येणार नाही, असे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास गेलेल्या शरणकुमार लिंबाळे

यादीत नावच नाही, अर्ज कसा भरता?
पुणे : आजीव सभासदांच्या यादीत तुमचे नाव नाही, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरता येणार नाही, असे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास गेलेल्या शरणकुमार लिंबाळे यांना साहित्य परिषदेकडून सांगण्यात आले. मात्र पैसे भरल्याची पावती सादर केल्यावर त्यांचा अर्ज स्वीकारला गेला.
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. लिंबाळे हे समर्थकांसह अर्ज भरण्यासाठी गेले असता ते परिषदेचे आजीव सभासद आहेत, अशी कोणतीही नोंद साहित्य परिषदेकडे नव्हती. त्यामुळे तुम्हाला अर्ज भरता येणार नाही, असे सुनविण्यात आले. तुम्हाला साहित्य पत्रिकेचा अंक येतो का, कार्यक्रमांची निमंत्रणे येतात का, असेही प्रश्न विचारण्यात आले.
लिंबाळे यांनी आजीव सभासदत्वासाठी भरलेल्या पैशांची पावती घरी शोधून काढली आणि ती व्हॉटस्अॅपद्वारे परिषदेला पाठविली. त्यानंतर त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला. यासंदर्भात लिंबाळे यांच्याकडे विचारणा केली असता २००७मध्ये परिषदेचे आजीव सभासदत्व घेतले असल्याचे ते म्हणाले. नोंदी ठेवण्यात परिषदेकडून चूक झाली असेल, असेही ते म्हणाले.
अरुण जाखडे यांच्या उमेदवारी अर्जावर श्रीधर माडगूळकर यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यांच्याबाबतची माहिती जाखडे अर्ज भरत असताना उपलब्ध झाली नाही.
तेही सभासद नसल्याचे सांगण्यात आले. तीन वर्षांपूर्वी माडगूळकर यांनी परिषदेच्या याच पदाधिकाऱ्यांकडे सदस्यत्वासाठी अर्ज भरला आहे. यापैकी काही पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या अर्जावर सह्यादेखील आहेत. पण ती माहिती ऐनवेळी उपलब्ध झाली नाही. दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारांच्या यादीत त्यांचे नाव होते, पण मतपत्रिका त्या वेळी मिळाली नसल्याचे माडगूळकर म्हणाले.
विठ्ठल वाघ यांचा दुसरा अर्ज
- ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेकडून अर्ज भरला होता, पण तांत्रिक अडचणींमुळे तो अर्ज बाद होऊ शकतो, हे लक्षात आल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून दुसरा अर्ज भरून घेतल्याचे समजले. यासंदर्भात वाघ यांच्याशी संपर्क साधला असता, तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून अन्य ठिकाणाहून अर्ज भरल्याचे ते म्हणाले.