लिम्का बुकनं दुष्काळाविरोधातल्या लढ्यातील २,४७५ जणांची घेतली दखल
By Admin | Updated: May 7, 2017 20:13 IST2017-05-07T20:13:13+5:302017-05-07T20:13:13+5:30
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यातील जनता एकवटली आहे

लिम्का बुकनं दुष्काळाविरोधातल्या लढ्यातील २,४७५ जणांची घेतली दखल
आॅनलाइन लोकमत
दहिवडी (सातारा), दि. 7 - दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यातील जनता एकवटली आहे. त्यातूनच रविवारी २,४७५ लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून एका दिवसात २१० लुज बोल्डर बांधले. या श्रमदानाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली असून, त्यांनी या श्रमदानाची माहितीही मागविली आहे.
बिदाल गावाने वॉटर कप जिंकण्याबरोबरच पाणीदार गाव करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. ग्रामस्थांनी एका दिवसात २१० लुज बोल्डर श्रमदानातून बांधून नवा अध्याय रचला आहे. प्रत्येक लुज बोल्डरसाठी दहा लोक आणि एक दगड जुळणारा एक अनुभवी कारागीर असे नियोजन केले होते. ठरलेल्या वेळेला ग्रामस्थांबरोबरच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, फलटण येथील आयडीएलच्या संस्थापिका वैशाली शिंदे यांचा ४५ जणांचा ग्रुप, माण मेडिकल डॉक्टर, वाघजाई गणेश मंडळ, वडगाव, खांडेवस्ती येथील ग्रामस्थांनीही उपस्थिती लावली होती. ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने श्रमदान करून २१० लुज बोल्डर बांधले. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केल्या जात आहे.
वॉटर कप स्पर्धेअंतर्गत माण तालुक्यातील ३२ गावांमध्ये कामे सुरू असून, या गावांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. बिदाल ग्रामस्थांनी एकी दाखवत पावसाचे पडणारे पाणी मुरवण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी नियोजन केले आहे. ग्रामस्थ दररोज सकाळी सहा वाजल्यापासून श्रमदानासाठी कामाच्या ठिकाणी पायी तसेच वाहनांनी येतात. त्यांच्या पिण्याचे पाणी व सरबताचीही सोय ग्रामस्थांतर्फे केली जाते.
गावाला जैन फाऊंडेशनने एक, शासनाचे दोन, शेखर गोरेंचे एक जेसीबी मशिन मोफत तर अंकुश गोरे यांनी डिझेलवर एक मशीन पोकलेन दिली. तसेच ग्रामस्थांनी दोन पोकलेन, सहा जेसीबी भाड्याने घेतल्या आहेत. त्यातूनच रविवारच्या श्रमदानातून एका दिवसात २१० लुज बोल्डर बांधण्यात यश आले आहे. बिदाल ग्रामस्थांच्या एकीमुळे दोन तासांमध्ये केलेलं श्रमदान हे एक कोटी रकमेपेक्षा जास्त मोलाचं आहे. रविवारच्या श्रमदानामुळे अडीच कोटी लिटरमध्ये जास्त पाणीसाठा होऊ शकतो. ही एकजूटच बिदाल ग्रामस्थांना वॉटर कप स्पर्धा जिंकून देईल.
- भगवानराव जगदाळे,
जिल्हा नियोजन अधिकारी, सातारा.